महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : फुटबॉल खेळाला तसेच खेळाडूंना चालना देण्याकरिता महानगरपालिकेच्यावतीने दि. ४ ते १५ मार्च २०२० या कालावधीत भव्य प्रमाणात महापौर चषक फुटबॉल स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धतील उपात्य पुर्व सर्व सामने खेळविण्यात आले होते. परंतु देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या बंदी आदेशामुळे महापौर चषक फुटबॉल स्पर्धामधील १ उपात्य सामना, तृतीय क्रमांक सामना व अंतिम सामना दि. १३ मार्च २०२० रोजी पासून स्थगित करण्यात आला होता. कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यामुळे शिल्लक राहिलेले सामने शुक्रवारपासून सुरु झाले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर, आमदार चंद्रकांत जाधव, एन.डी पाटील यांना सामन्यापुर्वी दोन मिनिटे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव व क्रिडा निरिक्षक सचिन पांडव यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, आदील फरास, अशकीन आजरेकर, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव आदी उपस्थित होते.
दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुध्द फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ यांच्यामधील उपांत्य सामना खेळविण्यात आला. यामध्ये दिलबहार तालीम मंडळाने १-० ने विजय मिळविला. तसेच दिलबहार तालीम मंडळ (अ) च्या सचिन पाटील याने ७४ व्या मिनिटास गोल नोंदवून संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. तसेच फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळच्या निलेश खापरे याला उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते सामन्यात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गिफ्ट देऊन गौरव करण्यात आले. शनिवार, दि.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी जनप्रतिनिधी विरुध्द प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण सामना खेळविण्यात येणार आहे.