गरिबांचे आधार ठरणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर देशात आदर्श -राज्यात कॅन्सर प्रतिबंधक ” होप एक्स्प्रेस ” सुरू करणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोल्हापूर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकीतून देशात कॅन्सर रुग्णावर आधुनिक तंत्रज्ञानातून उपचार करणारे डाॅ.सुरज पवार यांचे कोल्हापूर कॅन्सर सेंटर गोर गरिबांसाठी आधार ठरलेले आहे.रुग्णसेवेसाठी येथील अद्यावत तंत्रज्ञानाचा ध्यास पाहता,राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील सुधारणांसाठी त्यांचे थिंक टॅंक म्हणून मार्गदर्शन घेतले जाईल.तसेच या सेंटर प्रमाणे होप एक्स्प्रेस जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात पुढाकार घेऊ अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
‘ऑंन्कोप्राईम’ कोल्हापूर कॅन्सर सेंटर मधील मोझॅक-३ डी तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या अत्याधुनिक रेडीएशन मशीनचा लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रिमोट द्वारे संपन्न झाला.तसेच ग्रामीण भागातही रुग्णसेवेसाठी गडहिंग्लज येथील हत्तरकी हाॅस्पिटल येथे सुरू होत असलेल्या ऑन्कोप्राइम कॅन्सर सेंटर चे ऑनलाईनद्वारे उद्घाटन ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज गोकुळ शिरगाव येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये करण्यात आले. कॅन्सर रुग्णांसाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मार्फत केवळ सामाजिक बांधिलकीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून डॉ.सुरज पवार यांची आतापर्यंत सुरू असलेली रुग्णसेवा थक्क करणारी आहे. देशात आदर्श निर्माण करणारी आहे.त्यामुळेच कोल्हापूराच्या या अजब व्यक्तीला भेटण्यासाठी आपण येथे मुद्दाम आलो आहोत असे सुरवातीस स्पष्ट करत,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्ण -सेवेबरोबरच ऑन्को सर्जंन असलेले डॉ.सुरज पवार म्हणजे सृजन हृदयशील व्यक्तीमत्व होय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या फौंडेशन मार्फत सामाजिक सेवा तसेच साहित्य निर्मितीतुनही रुग्णांमध्ये सुरु असलेल्या प्रबोधनकार्याची आपल्या भाषणात मुक्तकंठाने प्रशंसा केली.शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर रुग्णांवर रुग्णालयाऐवजी आश्रमाप्रमाणे सेवा करण्याच्या सांजवात आश्रम प्रकल्पाचेही कौतुक त्यांनी केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले, आज राज्याच्या आरोग्य सुविधेत अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत.अनेक धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत.त्यामुळे राज्य शासनाला डॉ.सुरज पवार यांच्यासारख्या होतकरू,अभ्यासु,जिद्दी तसेच ध्येयाने पछाडलेल्या नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या संशोधकाची मार्गदर्शक म्हणून गरज आहे.यासाठी राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या थिंक टॅंकमध्ये त्यांचा सन्मानपुर्वक समावेश करुन,शासनाचे कुठे,काय चुकते यामध्ये मार्गदर्शन घेतले जाईल.तसेच कॅन्सर रुग्णांची लक्षणे ओळखून,उपचारासाठी ग्रामीण भागातही गोरगरिबांसाठी सेवा उपलब्ध करणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या कॅन्सर प्रतिबंधक व अचुक लवकर निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ” होप एक्सप्रेस ” प्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ” होप एक्स्प्रेस ” च्या नियोजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.शिवाय कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून विविध शासकीय योजनेतून रुग्णावर मोफत उपचार केले जातात.त्यामुळे राज्याच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतील काही त्रुटी येत असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल अशी यानिमित्ताने ग्वाही देत, भविष्यात कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा गडहिंग्लज प्रमाणे आता सर्वत्र विस्तार होऊन,सर्वच स्तरातील रुग्णांना लाभ मिळुन,जगणे अधिक सुसह्य होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुरज पवार यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण सेवेची प्रतिकुल परिस्थीती -तुन सुरुवात करताना आलेल्या अडचणी तसेच गेल्या वीस वर्षांत सामाजिक बांधिलकीतुन कोल्हापूर कॅन्सर सेंटरद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान ,संशोधनात्मक रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराचा आढावा घेतला.सर्वात अत्याधुनिक व भारतातील पहिलेच मोझॅक ३ डी तंत्रज्ञान असणारे येथील व्हर्सा एच.डी.रेडिएशन मशीन म्हणजे पश्चिम महाराष्ट्र,उत्तर कर्नाटक, कोंकण आणि गोवा येथील कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.या तंत्रज्ञामुळे रेडिएशन थेरपीमध्ये क्रांती घडेल असा ठाम विश्वास व्यक्त करत, विविध शासकीय योजनांतून कॅन्सरग्रस्तांवर मोफत व माफक दरात उपचार करता येणार आहेत.तसेच यापुढेही रुग्णसेवेसाठी जागतिक स्तरावरील बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले जाईल अशी ग्वाही सुद्धा डॉ.सुरज पवार यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे,आमदार राजेश पाटील तसेच डॉ.रविंद्र हत्तरकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी आमदार पी.एन. पाटील,आमदार जयंत आसगावकर,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील,डॉ.योगेश अनाप, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.योगेश साळे,डॉ.पराग वाटवे,ॲड.सरिता भोसले,व्ही.बी.पाटील,आदिल फरास,कुमार पाटील,उदय पाटील,राजेंद्र पाटील, अमल कटारिया,शशिकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे विश्वस्त डॉ.संदिप पाटील यांनी आभार मानले.
*वैशिष्ट्ये*
या मशीनमध्ये ६ -डी रोबोटिक तंत्रज्ञान तसेच रिअल टाईम ४-डी इमेज पाहण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असुन,अगदी १ मिमी पर्यंतच्या भागापर्यंत अचूकता साधण्यासह चार पट वेगाने अतिशय अचूक उपचार करणे शक्य झाले आहे. रेडिएशनचेही अतिशय कमी दुष्परिणाम असुन, कमीत कमी वेळेत अतिशय प्रभावी डोस देता येत असल्याने,काही विशिष्ट आजारांत रेडिएशन उपचारांचा कालावधी तब्बल सहा आठवड्यां -वरून एका आठवड्यात करता येणे शक्य होणार आहे.त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळुन,बरे होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
.