हस्तकलेच्या माध्यमातून व्यवसाय उभारावा – खासदार धैर्यशील माने, तीन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता देशामध्ये असलेल्या विविध हस्तकला आणि त्या माध्यमातून मिळणारा व्यवसाय उभा केला तर देश निश्चितच प्रगतीपथावर जाईल. यासाठी आपल्या कला जोपासाव्यात व त्याचे जतन करावे, असा आशावाद खासदार धैर्यशील माने यांनी आज व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या येथील हस्तकला विभागातर्फे कदमवाडीच्या भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तीनदिवसीय क्राफ्ट अवेरनेस प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. माने बोलत होते.हस्तकला विभागाचे सहायक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी शाळेमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केली. त्याला या शाळेने त्वरित प्रतिसादही दिला. येथे उभारलेल्या हस्तकलेच्या विविध दहा स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावरील प्रशिक्षण, प्रात्यक्षिक तर मिळेलच शिवाय त्यांच्यासाठी ड्रॉईंग व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.नियोजन भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नसीमा रहेमान यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे डॉ. एच .एम कदम, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर आर. व्ही कंठे, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. घोरपडे आणि डॉ. मीनाज कुलकर्णी यांच्यासह भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि हस्तकलेमध्ये पारंगत असलेले कलाकारही उपस्थित होते.
खासदार धैर्यशील माने यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभारण्याचे मार्गदर्शन तर केलेच शिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांशी हितगुज केले.