जयश्रीताई जाधव यांना बिनविरोध निवडून आणूया हीच खरी आमदार जाधव यांना श्रद्धांजली ठरेल- ना. हसन मुश्रीफ
कोल्हापूर/प्रतिनिधी : दोन वर्षात मिळवलेलं प्रेम आणि त्यांनी केलेल काम सर्वांच्या आठवणीत राहील, दानशूरपणा आणि प्रचंड आत्मविश्वास हे गुण चंद्रकांत जाधव अण्णांच्याकडे होते. भाजपने आपले मन मोठं कराव आणि त्यांच्या पत्नी जयश्रीताई जाधव यांना बिनविरोध निवडून आणूया हीच खरी आमदार जाधव यांना श्रद्धांजली ठरेल असे ना. हसन मुश्रीफ यांनी म्हटले. आमदार चंद्रकांत जाधव यांचा राजकीय प्रवास सांगताना ना. हसन मुश्रीफ यांनी आठवणी जाग्या केल्या. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते.
कोल्हापूरच्या उद्योजकांचे प्रश्न वारंवार मांडणारा, राजकारणापेक्षा कोल्हापूरचा विकास या भावनेने काम करणारा आमदार निघून गेल्याची भावना खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली. यावेळी जाधव यांचा दोन वर्षाचा राजकीय प्रवास उत्कृष्ट आणि सर्वांच्या आठवणीतला प्रवास होता. अण्णांची उद्योगासंदर्भातील तळमळ जवळून पाहिल्याची भावना आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.
राजकारण सोडून ते नेहमी काम करायचे, कोल्हापुरची कामे ते पोट तिडकीने मांडायचे असे उद्गार आमदार पी एन पाटील यांनी काढले. आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांनीही अण्णांच्या आठवणी सांगत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव याना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, शेकापचे बाबुराव कदम, माकपचे चंद्रकांत यादव, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), माजी महापौर निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, कादर मलबारी, अशोक भंडारी, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माणिक मंडलिक, आनंद माने, वसंतराव मुळीक, महेश जाधव, राहुल चिकोडे, बाबासाहेब देवकर, जयवंत हरूगले यांनी अण्णांच्या प्रति भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सर्व पक्षातील नेते, अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.