जनतेशी घट्ट नाळ असलेला आमदार आम्ही गमावला – ना.सतेज पाटील
कोल्हापूर : आ.जाधव हे विविध क्षेत्रात राबता असणारे व्यक्तिमत्व होते. उद्योग, क्रीडा यासह अनेक क्षेत्रात त्यांनी आपला गोतावळा निर्माण केला होता. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात त्यांची हातोटी होती. एक उदयोन्मुख आणि प्रश्न प्रभावीपणे मांडून ते तडीस नेणारा आमदार म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. औद्योगिक क्षेत्राचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अभ्यासू, मनमिळाऊ आणि दूरदृष्टी असणारे त्यांचे नेतृत्व होते.
कोल्हापुरात फुटबॉल वाढावा यासाठी ते सातत्याने कार्यरत होते .अनेक खेळाडूंना घडण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठबळ दिले. त्यांनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा समृद्ध केली .
माझ्यावर अण्णांनी भावासारखे प्रेम केले. आमच्या पाटील कुटुंबाशी त्यांचे घरगुती नाते होते . नुकत्याच त्यांच्या झालेल्या वाढदिसानिमित्त त्यांच्या घरी भेटायला गेलो असता तासभर अण्णा विविध विषयांवर भरभरून बोलत होते. शहराच्या विकासाबाबत त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती .आज एक स्नेही, भावासारखा ज्येष्ठ मित्र, सहकारी गमावल्याची भावना खूप क्लेशदायक आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. काँगेस जिल्हाध्यक्ष म्हणून , मंत्री म्हणून काम करताना त्यांची उणीव मला सदैव भासणार आहे. जाधव कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.