श्री पद्माराजे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दप्तर मिळावे: संस्थेच्या नियुक्त संचालकांची मागणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी: श्री पद्माराजे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर ही संस्था नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहे. याचे कामकाज संस्थेचे सचिव नामदेव राजाराम निपाणीकर हे पहात होते. संस्थेचे चेअरमन बाबुराव बळवंत कदम यांनी मार्च २०२१ अखेर संस्थेचे कामकाज पाहिले. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून कार्यालयाकडील अधिकारी सौ. एम. डी. भिउंगडे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड १६ जुलै २०२१ रोजी झाली. नूतन संचालक मंडळ आले. या आधी संस्थेचे ऑडिट झाले नव्हते. संचालकांनी मागणी करूनही तीन ते चार वर्षे सभा घेण्यात आली नाही. लाखोंचे व्यवहार परस्पर केले जात होते. त्यामुळे अविश्वासाचा ठराव आणला गेला. पण त्याआधीच बाबुराव कदम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नवीन संचालक मंडळाने जुलै महिन्यापासून कामकाजास सुरुवात केली. पण सचिव नामदेव निपाणीकर यांनी कोणतेही दप्तर (रेकॉर्ड) आम्हाला दिलेले नाही. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले.बाबुराव कदम यांनीही संचालक मंडळास कोणतीही कल्पना न देता तसेच सहकारी कायद्याच्या नियमांचे पालन न करता संस्थेचा कारभार केल्याचे नियुक्त संचालक मंडळास दिसून आले. सचिव निपाणीकर यांना सलग तीन वेळा नोटीस पाठवण्यात आली. पण त्यांनी याबाबतीत दुर्लक्ष केले. शेवटी त्यांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. तरीही त्यांनी परस्पर लाखो रुपयांचे व्यवहार केले आहेत.
सदर प्रकरणात आम्हाला आमचे कामकाज सुरळीत पणे पुढे करता यावे, यासाठी निलंबित सचिव नामदेव निपाणीकर यांनी संस्थेतील सर्व कागदपत्रे व शिक्के सोसायटीच्या संचालक मंडळाकडे सुपूर्त करावेत. तसेच नामदेव निपाणीकर हे आता श्री पद्माराजे गृहनिर्माण संस्थेचे सचिव नाहीत. त्यामुळे संस्थेचे सचिव म्हणून त्यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये. तसे केल्यास सदरचे व्यवहार पूर्णतः बेकायदेशीर असतील व ते संस्थेवर बंधनकारक राहणार नाहीत अशी मागणी संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब माळी आणि संचालक मंडळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
माजी अध्यक्ष बाबुराव कदम यांनी संस्थेचे राजारामपुरी येथील ऑफिसही परस्पर विकले आहे. बँक स्टेटमेंट मध्येही अनेक आर्थिक घोळ असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जाहीर इशारा नोटीसही वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अध्यक्ष विलास रामचंद्र सांळुखे,संचालक उमेश पाटील, आनंद जाधव,मोहन मोरे,मोहन शिंदे.
श्री.गंगाधरे,श्रीमती सुमन आनंदराव चव्हाण आदी उपस्थित होते.