ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थेच्यावतीने कोल्हापुरात प्रथमच ‘ओम महामंत्र का उच्चारण’ कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी: छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानाच्यावतीने कोल्हापुरात प्रथमत “ओम महामंत्र का उच्चारण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आणि बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सेंट्रल पंचायत हॉल, गांधीनगर, कोल्हापूर येथे संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत विनामूल्य हा कार्यक्रम होणार आहे. समाजात एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा, आपलेपणा कमी होत आहे. तरुणवर्गात वाढणारी बेरोजगारी यामुळे त्यांच्यात निराशा पसरत आहे. सतत माणूस मानसिक तणावाखाली असतो. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत आहे. अनेक आजार उद्भवतात. आज तरुणांमध्ये ब्लडप्रेशर, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी ओमचे उच्चारण हा या सर्व गोष्टींवर प्रभावी उपचार ठरत आहे. रोज सकाळी थोडा वेळ ओमचे उच्चारण केल्याने मानसिक शक्तींचा विकास होतो. दिवसभर मन प्रसन्न राहते. भारतातील प्रत्येक व्यक्तीने याचा अवलंब केला तर राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि विज्ञान सत्ता यांना एकत्रित करून भारत विश्वगुरू बनू शकेल. मुलांवर तसेच घरातील वयोवृद्ध यांच्यावरही याचा चांगला परिणाम दिसत आहे.ओम उच्चारण्याने घरातील वातावरण शांत व आनंदी राहते. ओम उच्चारण तर सगळेच करतात पण विधिपूर्वक केलेल्या ओम उच्चारणाने आपल्या मानसिक शक्तीचा विकास होतो.आणि आपल्या प्रत्येक कार्यात सकारात्मक बदल होतो.अशी माहिती संस्थेच्या संचालिका अंजना पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या “संस्थानच्या मुख्य संचालिका देवकी मैया यांनी ईश्वराच्या प्रेरणेने ही ओम उच्चारण्याची चळवळ सुरु केली. याचे अनेक फायदे होत आहेत.ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानाच्यावतीने संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी याचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. लहान मुलांवर आत्तापासूनच ओम उच्चारणाचे संस्कार झाले तर पुढे हीच पिढी सकारात्मक व संस्कारक्षम बनेल.यासाठी विविध शाळांमध्ये ओम ध्वनी उच्चारणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. कोल्हापुरात अशा प्रकारे हा कार्यक्रम प्रथमच होत आहे. तरी यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेच्या संचालिका अंजना पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पत्रकार परिषदेस नरेश चोइथानी,विठ्ठल चोपदार, तुमेश्वर साहू, हरीश कंजनी, जय सुंदरानी आदी उपस्थित होते.