शिवसेनेच्या रणरागिणींचे “जोडे मारो” आंदोलन – देशाच्या स्वातंत्र्याबाबत बरळणाऱ्या कंगना राणावतचे पद्मश्रीसह सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावा : शिवसेनेची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कंगना राणावत या अभिनेत्रीने ‘देशाला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले.’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा आणि स्वातंत्रसैनिकांचा अपमान केला आहे. गेल्या वर्षी कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली होती, अशी बेताल वक्तव्ये करून देशवासीयांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार भाजप सरकारने “पद्मश्री” पुरस्काराद्वारे कंगना राणावत हिला दिला आहे का? असा सवाल करीत देशाच्या स्वातंत्र्याबाबत बरळणाऱ्या कंगना राणावतचे पद्मश्रीसह सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कंगना राणावतच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कंगना राणावतच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करीत तिच्या पुतळ्यास शिवसेनेच्या रणरागिणीनी जोडे मारले.
याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करणाऱ्या कंगना राणावतचा धिक्कार असो”, अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.यावेळी बोलताना जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड यांनी, प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करून चर्चेत राहण्याच एकमेव काम अभिनेत्री कंगना राणावत हिच्याकडून सुरु आहे. मुंबईला जीवावर पोट भरायचं आणि मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणायचे, अंमली पदार्थाच्या सेवनाची जाहीर कबुली, अशा प्रकारची बेताल वक्तव्ये कंगना राणावत कडून झाली असताना भाजप सरकार “पद्मश्री” पुरस्कार देवून तिचा गौरव करते आणि पुन्हा कंगना राणावत स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करणारे बेताल वक्तव्य करते. याचा अर्थ भाजप सरकारने कंगना राणावत हिला देशवासीयांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार दिला आहे? उठ सुठ बेताल वक्तव्ये करायचा परवाना कंगना राणावतला देण्यात आला आहे का? त्याचे फळ म्हणून तिला सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार दिला गेला का? असा सवाल करीत स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करणाऱ्या कंगना राणावतने जाहीर माफी मागावी आणि पुढील काळात जिभेला आवार घालावा, असा इशारा देत देशाच्या स्वातंत्र्याबाबत बरळणाऱ्या कंगना राणावतचे पद्मश्रीसह सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावेत, अशी मागणी केली. या वेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगलताई साळोखे, पूजाताई भोर, गौरी माळतकर, पूजा कामते, सुनिता भोपळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, युवासेना शहरप्रमुख चेतन शिंदे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख रणजीत जाधव, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, राज भोरी, संजय लाड, सुशील भांदिगरे, मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, अभिषेक देवणे, अल्लाउद्दीन नाकाडे, रियाज बागवान, प्रशांत नलवडे, किरण पाटील, शैलेश साळोखे, बंडा माने, शैलेश गवळी, उदय घोरपडे, श्रीकांत मंडलिक, संतोष रेवणकर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.