सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपीची रक्कम जमा – जनरल मॅनेजर संजय घाटगे यांचे प्रसिद्धीपत्रक
सेनापती कापशी/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात श्री. घाटगे यांनी म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाला. २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ या अकरा दिवसांमध्ये एकूण ६६ हजार, ७७७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. प्रतिटनाला २,९६० रुपये एकरकमी एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम १९ कोटी,७६ लाख, ६१ हजार, ४२६ रुपये एवढी होते. त्यापैकी, तीन कोटी, १८ लाख, चार हजार, ४३९ रुपये एवढी रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. १६ कोटी, ५८ लाख, ५६ हजार, ९८७ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा केली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे, गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यामध्ये गुरुवार दि. ११ ऑक्टोबर पासून संपर्क साधावा व ऊस बिलाच्या रकमा व पावत्या घेऊन जाव्यात, असे आवाहनही कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. घाटगे यांनी केले आहे.