विकास कामातून गावा- गावांचा कायापालट करा – मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन,हासूर बुद्रुकला साडेतीन कोटींच्या विकासकामांची उद्घाटने
सेनापती कापशी/प्रतिनिधी :ग्रामविकास खाते ही विकासाची गंगा आहे. गट -तट न मानता विकासकामांच्या माध्यमातून गावा- गावांचा कायापालट करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हासूर बुद्रुक ता. कागल येथे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे होते.
गावात २५:१५ योजनेअंतर्गत अंतर्गत रस्ते -दहा लाख, अंतर्गत गटर्स -दहा लाख, जुनी चावडी ते माळवाडी रस्ता -पाच लाख, अंगणवाडी इमारत- दहा लाख, रस्ते खडीकरण, काँक्रिटीकरण – २० लाख या ५५ लाखांच्या कामांचे उद्घाटन झाले. तसेच मंजूर झालेल्या अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण -१५ लाख, अंतर्गत रस्ते, हाफ राउंड व आरसीसी गटर्स -दहा लाख, अंतर्गत रस्ते- दहा लाख अशा ३५ लाखाच्या कामाचे भूमिपूजन झाले. तसेच पंतप्रधान सडक योजनेतून गावातून कामत रस्ता -पावणेदोन कोटी, ग्रामसचिवालय -५२ लाख, नळपाणी पुरवठा योजना -३२ लाख, शाळा इमारत सुधारणा -पाच लाख अशा दोन कोटी ६४ लाखांच्या कामांचा प्रारंभ झाला.
कार्यक्रमापूर्वी प्रमुख मान्यवरांची गावातून सवाद्य मिरवणूक निघाली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, हासुर खुर्दचे माजी सरपंच अंकुश पाटील, अशोकराव कांबळे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, माजी सरपंच बाबुराव भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, दीपक सोनार, मनोज वास्कर, धनाजी तोरस्कर, गिरीश कुलकर्णी, बाळासाहेब तुरंबे, सुभाष गडकरी, राजाराम भोसले, मच्छिंद्र पाटील, पांडुरंग चौगुले, धनाजी निंबाळकर, शिवाजी रेडेकर, गणेश पंडूरकर, प्रवीण निंबाळकर, भोसले, शिवाजी भोसले, शंकर तिप्पे, एकनाथ शिंदे, मारुती कांबळे, शिवाजी नरतवडेकर, दशरथ नाईक, गजानन निंबाळकर आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत उपसरपंच पुरुषोत्तम साळोखे यांनी केले. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी केले. सुत्रसंचलन कृष्णाचा राऊत यांनी केले. आभार सतीश भोसले यांनी मानले.