बैलगाडी शर्यती सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था व सांस्कृतिक वारसा असलेल्या बैलगाडी शर्यतीबाबत आज मंत्रालयाच्या आवारामध्ये शेतकरी बांधवांसह पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील उपस्थित होते.
राज्यातील बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.पारंपारिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.बैलगाडी शर्यत सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल असा मार्ग काढून बैलगाडी शर्यती लवकरात लवकर सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.
तसेच, महाराष्ट्रातील खिलार, धनगर खिलार, कोसा खिलार, काजळा खिलार, कृष्णा यांसारख्या बैलांच्या प्रजातींचे संगोपन करण्यासाठी योग्य त्या सर्व ठोस उपायोजना करण्यात येणार आहेत.यावेळी, जलसंपदामंत्री ना. जयंत पाटीलजी, आ. संग्राम थोपटे, आ. शशिकांत शिंदे,आ. निलेश लंके, आ.किसन काथोरे, आ.अनिल बाबर, आ. संग्राम जगताप, राज्यातील बैलगाडी मालक, संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.