आँनलाईन शाळा प्रणाली राज्यभर राबविणार- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
बानगेत आँनलाईन शाळा प्रणालीचा प्रारंभ
बानगे/प्रतिनिधी : ऑनलाइन शाळा ही देशातील पहिली अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आहे.आता ही प्रणाली राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बानगे ता. कागल येथील केंद्रीय शाळेत आँनलाईन शाळा व्हँर्च्युअल अँकँडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर होते. अहमदनगरच्या दिप फाऊंडेशनचे तंत्रस्नेही शिक्षक संदिप गुंड यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गरज ही शोधाची जननी असते. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अंधकारमय ढग निर्माण झाले. परंतु,आता आँनलाईन शिक्षण पद्धतीमुळे प्राथमिक शिक्षणही सर्वात पुढे असेल. वाड्यावस्त्यावरही हे शिक्षण पोहचविण्यासाठी सोलर किटची निर्मिती केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणारी ही आँनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून१लाख६८हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. ही महत्वकांक्षी प्रणाली संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही शिक्षण प्रणाली अत्यंत प्रभावी असल्याने कोरोना गेल्यानंतरही सुरूच ठेवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
आँनलाईन शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करून प्राथमिक शाळेतील मुलांनाही या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अहमदनगरचे तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांचा सन्मान करण्यात आला.तसेच, इंटरनेट व वीज नसतानाही सौरऊर्जेवर चालणारे नाविन्यपूर्ण सोलर किट श्री गुंड यांनी विकसित केले आहे.हे किट बोळावीवाडी येथिल वि.म.शाळेला दिले.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी केले. वसंत जाधव, रमेश सावंत यांचीही मनोगते झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवानी भोसले, उपसभापती मनिषा सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, रविंद्र पाटील, जयदीप पोवार, सरपंच वंदना सावंत, जी. एस. पाटील, राहूल पाटील, दत्ता सावंत, विकास सावंत आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.तर गजानन गुंडाळे यांनी आभार मानले
चौकट–
वारसा राजर्षी शाहूंच्या शिक्षणव्यवस्थेचा बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी १०० वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यानंतर आता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत प्राथमिक शाळेत शिकणारी गरीबांची मुले शिक्षणात मागे राहू नयेत, यासाठी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांची सातत्याने धडपड सुरू होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज या आँनलाईन प्रकल्पाला मूर्त स्वरूप आले आहे. ना. मुश्रीफ हे छत्रपती शाहूंचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा जपणारे आणि दुरदृष्टी असणारे राजकर्ते आहेत, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काढले.
चौकट–
विद्यार्थी व शिक्षक केंद्रित प्रणाली
आँनलाईन शाळा ही अध्ययनातील पोकळी भरून काढणारी प्रणाली आहे. एकाच विद्यार्थ्यांला २२ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. अध्ययान,अध्यापन व मुल्यमापन करता येणारी विद्यार्थी व शिक्षक केंद्रीत सहज शिकता येणारी प्रणाली आहे. यामुळे मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढणार असल्याचे दिप फाऊंडेशनचे संदीप गुंड यांनी सांगितले.