पन्हाळगडावर विविध देशी २५० झाडांचे रोपण,वृक्षारोपणातून शिवरायांना राज्याभिषेकदिनी मानाचा मुजरा!
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवराज्याभिषेकदिनी विविध देशी २५० झाडांचे रोपण करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची संकल्प शपथ यावेळी घेण्यात आली.पन्हाळा नगरपालिका, मदत फाऊंडेशन, शिवराष्ट्र हायकर्स, सह्याद्री देवराईच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. पन्हाळगडावरील टेलिफोन टॉवर परिसरात खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल, रवींद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खार्गे, सीए असोसिएशनचे अध्यक्ष तुषार अंतुरकर, धनश्री अंतुरकर, पीडियाट्रिक असोसिएशनचे सचिव डॉ. सुनील पाटील, डॉ. विद्या पाटील, कंपनी सेक्रेटरी असोसिएशनचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
या उपक्रमात कोल्हापूर पीडियाट्रिक असोसिएशन, कोल्हापूर सीए असोसिएशन, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन, पन्हाळा नगरपालिका, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, गुरू गोरक्षनाथ गोशाळा सहभागी होत्या. पन्हाळगडावर वड, पिंपळ, जाभूंळ, करंज, आंबा, बहावा, सीताफळ, चेरी, पेरू, कदंब, जारुळ, बकुळ, गुंज, अर्जुन, सीता अशोक, रामफळ अशी २५० प्रकारची देशी झाडे लावण्यात आली. यावेळी शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगून वृक्षारोपण चळवळीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सीए नीलेश भालकर, डॉ. विजय गावडे, कपिला टिक्के, पद्मसिंह पाटील, राजेंद्र पोवार, मकरंद सूर्यवंशी, विक्रांत भागोजी, विनायक जरांडे, आशिष सेवेकरी, इंद्रजित पवार, गणेश कदम, अभय कुलकर्णी, शीतल महामुनी आदी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले होते.