कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस बंद राहणार : आमदार चंद्रकांत जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापुरातील एमआयडीसी आठ दिवस बंद राहणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजक्शनची कमतरता, या पार्श्वभूमीवर कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉक डॉन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापुरातील एमआयडीसी बंद ठेवणेबाबत औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडे होती. यानुसार आमदार जाधव यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, हर्षद दलाल यांच्यासाेबत चर्चा केली.
कोल्हापुरातील कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असून, कडकडीत लॉकडाऊन करण्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. आमदार जाधव यांच्या आवाहनास प्रतिसाद देत रविवार दिनांक १६ ते रविवार दिनांक २३ पर्यंत एमआयडीसी बंद ठेवण्याचा निर्णय औद्योगिक संघटनांनी घेतला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक संघटनानी केलेल्या विविध मागण्या शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी उद्योजकांना दिले.