शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर – शेंडा पार्क येथे २०० खाटांचे परिपुर्ण ॲडव्हान्स कोरोना केअर युनिट युध्दपातळीवर सुरु करावे – खासदार संजय मंडलिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्युदर हा दिवसें-दिवस वाढतच चालला असल्याकारणाने हा मृत्यु दर नियंत्रणात आणावयाचा झाल्यास शासकीय महाविद्यालय शेंडा पार्क याठिकाणी अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रणाली तसेच हाई फ्लो ऑक्सिजन कॅनोला व बायपे युक्त २०० खाटांचे ॲडव्हांन्स कोरोना केअर युनिट युध्दपातळीवर उभा करावे अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम. उध्दवजी ठाकरे यांचेकडे राज्यातील शिवसेना खासदारांच्या व्हिडिओ काँन्सफरंन्सव्दारे बोलावलेल्या बैठकीदरम्यान केली. सिरीयस झालेले पेशंट वाचवण्यासाठी हीच उपकरणे फार मोलाची ठरतात असे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये निघालेला आहे अशा प्रकारचे रुग्णालय उभा करून त्याची व्यवस्था ही सेवाभावी संस्था किंवा कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांना देऊन येणाऱ्या कालावधीसाठी ही महामारी कोकणामध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशी चर्चा यावेळी झाली. खासदार मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून या व्हि.सी. व्दारे मान.मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला.
कोल्हापूर जिल्ह्याला दररोज ५० मे.टन इतक्या ऑक्सीजनची आवश्यकता असताना दररोज ३५ मे.टन इतकाच ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. कर्नाटक राज्यातील बेलारी येथून येणारा ऑक्सीजन हा तांत्रिक अडचणीस्तव थांबला असल्याकारणाने त्याचा तणाव कोल्हापूर जिल्हयाला जाणवत आहे. सध्या सी.पी.आर. हॅास्पीटल येथे ४०० ते ५०० कोविड रुग्ण उपचार घेत असून सी.पी. आर. हॅास्पीटलला दररोज स्वतंत्र १० मे.टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा अशी मागणी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या केली. रेमडिसिव्हर इंजेक्शन संदर्भात जिल्ह्याची दैनंदिन आवश्यकता ४००० इंजेक्शन इतकी असताना निव्वळ २५० इतकीच इंजेक्शन मिळत असल्याकारणाने गंभीर रुग्णांना इंजेक्शनकरीता वणवण फिरावे लागत आहेत. याकरीता रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा. हीच परिस्थिती लसीकरणाबाबतही असून दैनंदिन ५० हजार इतक्या डोसची आवश्यकता असताना दोन दिवसातून २० हजार डोस उपलब्ध होत असल्या कारणाने शासकीय दवाखान्यांवर याचा ताण पडत असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री महोदयांनी दिली