राजर्षी शाहू आघाडीला राजू शेट्टी, अशोक चराटी यांचा पाठिंबा, विरोधी आघाडीला मोठा धक्का!
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच अशोक चराटी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा पत्रकार बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी केली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, सावकार मादनाईक, जालिंदर पाटील आदी आघाडीचे नेते उपस्थित होते.
आज झालेल्या पत्रकार परिषदमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपण सत्तारूढ आघाडी बरोबर जात असलेली घोषणा करत. विरोधी आघाडीला मोठा धक्का दिला आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यामध्ये चांगली ताकद असल्याने त्याचा फायदा सत्तारूढ आघाडीला होणार आहे.
दरम्यान, ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली होती. तेव्हा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये शेट्टी यांनी पाठिंब्याबाबत अनुकूलता दर्शविली होती. याबाबतची अधिकृत घोषणा आज, बुधवारी कोल्हापुरात झाली.
निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राजू शेट्टी हेही त्यांच्यासोबत राहतील, असे वाटत होते. मात्र, पॅनल बांधणीसह इतर घडामोडींमध्ये त्यांचा फारसा संपर्क राहिला नाही. .उलट राजू शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी शेट्टी यांची ‘गोकुळ’ निवडणुकीतील भूमिकेची दिशा स्पष्ट झाली होती. काल महाडिक यांनी शेट्टी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मल्टीस्टेटचा रद्द केलेला ठराव, कोरोना काळात दूध उत्पादकांना झालेली मदत आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सत्तारूढ गटाला पाठिंब्याबाबत शेट्टी यांनी अनुकूलता दर्शविली होती.