ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने तब्बल २२ रुग्णांना ऑक्सिजन विना मृत्यू
नाशिक/प्रतिनिधी : महापालिकेच्या झाकीर हुसेन या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने तब्बल २२ रुग्णांना ऑक्सिजन विना आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. बुधवार दिनांक 21 रोजी दुपारी बाराच्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. तोपर्यंत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.