गोकुळ दूध संघाचा एक ठरावधारक कोरोनामुळे मृत्यूमुखी
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्तारुढ आणि विरोधी आघाडीतर्फे सध्या उमेदवार निश्चिती आणि पॅनेल बांधणी केली जात आहे. येत्या काही दिवसात पॅनेलची घोषणा होणार आहे. निवडणुकीची ही धामधूम सुरू असतानाच गोकुळ दूध संघाचा एक ठरावधारक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारक आहे. सुभाष सदाशिव पाटील असे त्यांचे नाव आहे.
त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. शनिवारी, ता. १७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पाटील हे डोणोली येथील आहेत.
‘गोकुळ’साठी दोन मे रोजी मतदान आहे. सध्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा कालावधी आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या एका गटाच्या मेळाव्यातील आठ ते दहा ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा होती. यामध्ये ठरावधारकासह काही इच्छुक उमेदवारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. कोरोना स्थितीमुळे गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी अशी याचिका कोर्टात दाखल केली होती.