महाविकास आघाडीचा भाजपला धक्का,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपचे अध्यक्ष असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचे आदेश आज राज्य शासनाने काढले. आज राज्य शासनाने अध्यक्षांसह समितीचा कार्यकाल संपुष्टात आणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच धक्का दिला आहे.
शासनाच्या या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष व भाजपचे महेश जाधव यांच्यासह सहा सदस्यांचे कार्यकाळ संपुष्टात आला. राज्य सरकारच्या विधी आणि न्यायविभाग यांनी हा आदेश काढला आहे. कोल्हापुरसह सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ४२ मंदिराचा महसुलासह त्यावरील नियंत्रणाची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली होती. राज्यात २०१४ साली भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही पहिली तीन वर्षे या समितीला अध्यक्ष व सदस्यच नव्हते. १६ ऑगस्ट २०१७ रोजी राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, वैशाली क्षीरसागर, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. गेली चार वर्षे या समितीमार्फत कामकाज सुरू होते.
राज्यात २०१९ मध्ये शिवसेना – राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर गेल्या दीड वर्षात या सरकारने भाजपाचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त करून तेथे तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची तयारी सुरू केली आहे.या राज्य सरकारच्या निर्णयामुळे भाजपाला धक्का देण्यात आला आहे.