महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्या – एच. के. पाटील,काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजनांच्या संदर्भात चर्चा केली. याबरोबरच राज्यातील सद्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातही सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाली होती त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे अशीही मागणी करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असेही पाटील म्हणाले.