‘गोकुळ’साठी आज २५ मार्चपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, २ मे रोजी मतदान, ४ मे रोजी मतमोजणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक आणि सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संचालकपदाच्या २१ जागांसाठी येत्या दोन मे रोजी मतदान होत आहे. तर चार मे रोजी मतमोजणी होईल.आज तारीख २५ मार्च पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पॅनेल या दोघामध्ये लढत होईल. या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने नुकतीच गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. गुरुवारपासून (ता.२५ मार्च) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. २५ मार्च ते १ एप्रिल हा कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे. ५ एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. ६ एप्रिलला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा सहा ते २० एप्रिल असा आहे. उमेदवारांना २२ एप्रिल रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे.प्रत्यक्षात २ मे रोजी मतदान आणि ४ मे रोजी मतमोजणी होईल. यामध्ये सर्वसाधारण गटातून १६ उमेदवार असतील. महिला प्रतिनिधी २ असतील. तर ओबीसी, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त् गटासाठी प्रत्येकी १ जागा असेल. मतदानासाठी एकूण पात्र संस्था ३६५६ इतक्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.