गृहमंत्री आणि या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा भाजपाचे कोल्हापूमध्ये आंदोलन
भ्रष्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करा – राहूल चिकोडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र भर गृहमंत्री आणि या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे.
आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने बिंदू चौक येथे सकाळी ११ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून या सरकारचा व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी या महावसुली सरकारचा तीव्र निषेध केला. ‘१०० कोटी माझे…..आता नाहीत वाझे माझे’, ‘महा वसुली सरकारचा धिक्कार असो’, ‘गृहमंत्री राजीनामा द्या’ ‘ अनिल देशमुख हे गृहमंत्री की….वसुली मंत्री’, ‘ अनिल देशमुख यांचा धिक्कार असो’, ‘ठाकरे सरकार चले जाओ’, ‘आता तर हे स्पष्ट आहे……ठाकरे सरकार भ्रष्ट आहे’ असे फलक घेऊन घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी, ऐतिहासिक दाखला देत ज्या पद्धतीने विजापूरच्या आदिलशहाने अफजल खानाला करवसुलीसाठी महाराष्ट्रात पाठवले होते त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचे काम गृहमंत्र्यांच्या कडून होत आहे आणि हा त्यांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी हाणून पाडून त्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा होण्यासाठी जोरदार निदर्शने करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अजित ठाणेकर म्हणाले, वरिष्ठ पोलीस अधिका-याने गृहमंत्र्यावर लाच मागितली असल्याचा देशातील अशा पद्धतीचा पहिलाच प्रकार आपल्या महाराष्टात घडला असे सांगितले. हे सरकार महाराष्ट्राची नासाडी करत आहे. या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात समाज द्रोही घटना वाढत चालल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी कागल येथे शिष्यवृत्ती पेपर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्णक अवमान कारक मजकूर करण्यात आला होता. यातून आपल्याला घ्यायचा बोध म्हणजे अशा सरकारमुळे असे कृत्य करणा-यांचे मनोबल वाढणार असून हे सरकार आपल्याला पाडले पाहिजे.
सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, अधिवेशनाच्या काळामध्ये भाजपाच्यावतीने सचिन वाझे हा विषय चांगल्या पद्धतीने मांडून त्यांचा राजीनामा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न होते परंतु याच गृहमंत्र्यांनी वाझे यांना पाठीशी घातले होते. मुख्यमंत्री यांनी वाझे काय लादेन आहेत काय ? असा सवाल उपस्थित केला होता. आता मुख्यमंत्री गप्प का असा सवाल केला. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचे मशीन सापडत असेल तर महाराष्ट्रातील जनतेची लुट करण्याचे काम हे वसुली सरकार करत आहे. त्यामुळे अशा गंभीर बाबीसाठी गृहमंत्री यांचा तीव्र निषेध याठिकाणी करण्यात येत आहे.
संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी हा घडलेला प्रकार म्हणजे फक्त हिमनगाचे टोक असून यापुढे देखील असा प्रकारचा भ्रष्टाचार समोर येणार आहे. याप्रकरणात सचिन वाझे यांची नार्को टेस्ट घेऊन यामधील सर्व मंत्री, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी केली. मंदिरे उघडायची सोडून पब आणि बार उघडण्यासाठी इतका आटापिटा का सुरु होता त्याचा उलगडा आता होतोय असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे हे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील एक मोठे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर जे आरोप केले आहेत यामुळे या सरकार मधील वसुली एक प्रकारे चव्हाट्यावर येऊन महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम या प्रकरणामुळे उजेडात आले आहे. एका API सारख्या पोलीस अधिका-या कडून गृहमंत्री जर १०० कोटी वसुली करून घेत असतील तर गृहमंत्र्यांची एकूण कमाई किती असेल असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता. संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांना खंडणी, बलात्कार अशा सर्व गंभीर बाबींना माफी आहे अशी स्थिती आहे. ही अनैसर्गिक युती असल्यामुळे सरकार मध्ये कोणाताही ताळमेळ दिसत नाही. सरकार कधीही पडेल अशी सध्याची स्थिती असून फक्त ओरबडून घ्या हीच वृत्ती सर्व ठिकाणी दिसत आहे. या सर्व प्रकरणावर जाणते राजे म्हणवून घेणारे नेते सध्या अबोल आहेत. वीज तोडणीसाठी सर्वसामान्य जनतेच्या दारात जातात आणि १०० कोटीचा भ्रष्ट्राचार करणा-या मंत्र्याची पाठराखण या महाराष्ट्रात होत असेल तर ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे. आतातर सोशल मिडीयाच्या माध्यमातून सकाळ पासून एक विनोदी प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे, “महिन्याला १०० कोटी तर “वर्षा” ला किती ? त्याचबरोबर वीज तोडणी प्रश्नी यापुढे जर वीज तोडणीसाठी महावितरणचे कर्मचारी येत असतील तर त्याला जाब विचारून प्रसंगी भारतीय जनता पार्टी संघर्ष करण्यात मागे हटणार नाही तसेच काल एका व्यक्तीने वीज तोडणी करायला महावितरण चे लोक आले असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने जर कोणी दगावले तर याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनाम घेऊन त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, महेश यादव, अमर साठे, शैलेश जाधव, सचिन सुराणा, कालिदास बोरकर, नरेंद्र पाटील, प्रशांत गजगेश्वर, दिलीप बोंद्रे, किरण नकाते, विराज चिखलीकर, आसावरी जोरदार, प्रज्ञा मालंडकर, गौरव सातपुते, विवेक वोरा, धीरज पाटील, सिद्धू पिसे, विजय पाटील, दिनेश पसारे, प्रकाश घाडगे, तानाजी निकम, विठ्ठल पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष गिरीश पालवे, भगवान काटे, बापू राणे, महेश मोरे, अरविंद वडगावकर, विशाल पाटील, विशाल शिराळकर, अक्षय निरोखेकर, जयदीप मोरे, सिद्धार्थ तोरस्कर, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, गिरीश साळोखे, रहीम सनदी माणिकराव बाकडे, सौ खाडे, सचिन मुधाळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.