कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे
सहायक आयुक्त संजय माळी यांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधो : कुशल मनुष्यबळाच्या पुरवठ्याकरिता शासनामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मोफत चालविण्यात येत असून याचा गरजू व नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यवा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
सन २०२०-२१ साठी सी एन सी प्रोग्रॅमर /ऑपरेटर, हँड एम्ब्रॉडर, सुईंग मशिन ऑपरेटर, सेल्फ एम्प्लॉएड टेलर, जनरल ड्युटी असिस्टंट असे विविध कोर्सेस निश्चित करण्यात आले असून या कोर्सचे प्रशिक्षण पात्र संस्थांमार्फत देण्यात येते.या क्षेत्रातील अभ्यासक्रम एन.एस. क्यू.एफ स्तराशी सुसंगत असावे लागतात. प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण संस्था स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच एन. एस. डी. सी मान्यता प्राप्त प्रधानमंत्री कुशल केंद्र यांना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० सन २०२०-२१ मध्ये राबविण्यात येत असून त्यासाठी सी. एस.सी.एम (सेंट्रल स्पॉन्सर सेंट्रल मॅनेज) साठी ४९३ उद्दीष्ट्य असून सी.एस.सी.एम (सेंट्रल स्पॉन्सर स्टेट मॅनेज) साठी २२२ इतके उद्दीष्ट्य देण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या स्किल इंडिया पोर्टलवर सूचीबध्द असलेल्या पात्र ९ संस्थांना हे उद्दिष्ट्य वाटप करण्यात आले असून ऍ़टोमोटिव्ह, सर्व्हिस टेक्निशियन, सेल्फ एम्प्लॉएड टेलर, फिल्ड टेक्निशियन व कॉम्प्युटिंग पेरिफेरल अशा कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान अंतर्गत ४६० उद्दिष्ट्य असून केंद्र सरकारच्या स्किल इंडिया पोर्टलवर सूचीबध्द असलेल्या पात्र संस्थांमार्फत हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये डोमेस्टिक डेटाएंट्री ऑपरेटर, ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सेल्फ एम्प्लॉएड टेलर इत्यादी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येते.
किमान कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यामध्ये प्राप्त निधीच्या अनुषंगाने प्रशिक्षण कोर्स व उद्दिष्ट ठरविण्यात येते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई मार्फत प्राप्त सूचनानुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. हा कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्था यांच्याद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.