हदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया आता कोल्हापुरात शक्य
अॅपल हॉस्पिटल्स कोल्हापूर येथे सुविधा उपलब्ध
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील अॅपल हॉस्पिटल्सला शासनाकडून हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. या सुविधेमुळे कोल्हापूर हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध असणारे पुणे ते बेंगलोर दरम्यानचे एकमेव शहर ठरले आहे.अशी माहिती प्रमुख कार्डीऑलॉजिस्ट डॉ. अशोक भूपाळी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले आहेत कि “तरुण वर्गातील व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. या मध्ये हार्ट अॅटॅक, डायलेटेड कार्डीओमायोपथी या सारख्या विविध प्रकारच्या हृदयविकारांचा समावेश आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये अॅन्जीओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, झडप बदलणे या सारख्या उपचारानंतर बऱ्याचदा हृदयाचे कार्य पूर्ववत होते. पण काही रुग्णांची हृदयाची कार्यक्षमता केवळ २०% किंवा त्यापेक्षाही कमी होते. अशा रुग्णांना कोणतीही औषध प्रणाली लागू पडत नाही. या स्थितीला ‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’ असे संबोधले जाते. या रुग्णांचा कालांतराने मृत्यु होतो”.‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’, डायलेटेड कार्डीओमायोपथी (हृदयाच्या स्नायूंचा आजार) किंवा अति गंभीर अवस्थेतील जन्मजात हृदयविकार असणार्या रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उपयोगी ठरतो.
अॅपल हॉस्पिटल्सल येथे या शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. महादेव दीक्षित उपलब्ध असणार आहेत. त्यांच्या टीममध्ये हार्ट सर्जन डॉ.अमृत नेर्लीकर, हृदयविकार तज्ञ डॉ.अशोक भूपाळी, डॉ.अलोक शिंदे , डॉ. विनायक माळी, डॉ.शीतल देसाई तसेच तज्ञ नर्सेस , परफ्युजनिस्ट यांची मोठी टीम उपलब्ध आहे. तसेच येथे अत्यंत प्रगत अशी दोन मोड्युलर ऑपरेशन थियेटर व शस्त्रक्रिया पश्चात देखभालीसाठी अद्ययावत आय.सी.यु. उपलब्ध आहे.
या विषय अधिक माहिती देताना येथील प्रमुख हार्ट सर्जन डॉ.महादेव दीक्षित म्हणाले कि, “ मी माझ्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास २५,००० हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत.तसेच बंगलोर येथे कार्यरत असताना हृदय प्रत्यारोपणशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ही सुविधा पूर्वी कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे हृदय मुंबई , बेंगलोर ,चेन्नई इत्यादी मोठ्या शहरात विमानाने पाठवावे लागत असे. या प्रक्रियेस बराच कालावधी लागत असे. परंतु आता कोल्हापुरातच हृदय प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध झाल्याने‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास लागणारा कालावधी हा बराच कमी होणार आहे. हि बाब अत्यंत महत्वाची आहे कारण ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर ६ तासांच्या आत त्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण होणे हे अनिवार्य असते. तसेच शस्त्रक्रियेच्या खर्चाव्यतिरिक्त विमान सुविधा उपलब्ध करण्यासाठीचा मोठा आर्थिक भार रुग्णावर पडायचा तोदेखील कमी होणार आहे.
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोल्हापुरात उपलब्ध झाल्याने त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील गरजू व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती संस्थेच्या डायरेक्टर गीता आवटे यांनी दिली.