लोक उत्कर्ष समिती संचलित चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटी चित्रतपस्वी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे १४ मार्च रोजी आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर हे चित्रपटाची पंढरी म्हणून ओळखली जाते. चित्रपट चित्रीकरणाचा पहिला कॅमेरा बनवण्याचा प्रयोगही कोल्हापुरात झाला. चित्रपट निर्मितीचे तंत्र कोल्हापुरात विकसित झाले.चित्रपट निर्मिती व्यवसाय कोल्हापुरात रुजविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. कथा, पटकथा, गीत रचना, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्वच गोष्टींमध्ये ते पारंगत होते. मराठी बोलपटांचे वैविध्य त्यांनी राष्ट्रीय पातळीवर उमटवले.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक गोष्टी भालजी पेंढारकर यांनी केल्या. चित्रपट निर्मिती मागचा त्यांचा विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रतपस्वी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रविवारी, १४ मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा फेस्टिव्हल होणार आहे अशी माहिती विश्वराज जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर आणि ‘गोकुळ’ चे अध्यक्ष श्री. रविंद्र आपटे यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात मराठी व अन्य भाषेतील शॉर्ट फिल्म दाखवल्या जाणार आहेत.यामध्ये सर्वोत्कृष्ट तीन शॉर्ट फिल्म्स ना चित्रतपस्वी, चित्रदर्शी आणि कलासक्त तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा, छायाचित्रण, संकलन, पार्श्वसंगीत अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवारी संध्याकाळी सहा वाजता शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने नवोदित कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळेलच.याशिवाय चित्रपंढरीमध्ये पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होण्यास हातभार लागेल. तरी रसिक प्रेक्षकांनी या फेस्टिव्हल चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीचे दीपक बिडकर, शिरीष हुपरीकर, महेश गोटखिंडीकर, विश्वराज जोशी, सागर वासुदेवन, विवेक मंद्रुपकर, केदार मुनीश्वर उपस्थित होते.