महिला दिनानिमित्त औद्योगिक न्यायालयातील महिलांचा सन्मान क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू पुरूषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू, पुरूषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू’ या कवितेतून महिलांची व्यथा मांडतानाच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावरील दगड फोडणाऱ्या, ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या महिलेपर्यंत पोहचवा, असा संदेश दिला.येथील औद्योगिक न्यायालयातील सुनिता कृष्णात बुवा, चैत्राली बबन कोरवी, मनस्वी दिग्विजय लिंगडे, तेजस्विनी प्रदिप शिंदे, शोभा संजय कडू, उज्वला नारायण भारती, विनीता नागराळे या महिला कर्मचाऱ्यांचा महिला दिनानिमित्त रोप आणि भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुणे श्री. सातपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती समिना ए. खान, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अर्चना जी. बेहरे उपस्थित होत्या.अर्ध जग महिलांचं असं म्हणतात. तर उर्वरित अर्ध जग महिलांपासूनचं असतं, असे श्री. सातपुते पुढे म्हणाले, ‘ती’ असते सुरूवात आणि ‘तीच’ असते सर्व काही, तिच्या पलीकडे काही नाही, तिला सन्मान द्यायला पाहिजे या मागणीपेक्षा तिला सन्मान मिळत आहे, ही सन्मानपूर्ती ऐकायला हवी. ‘तू जगदंबा, तू भवानी, विद्येची तू साक्षात सरस्वती! परंपरेच्या श्रृंखला तोडण्या आली फातिमा आणि सावित्री…’ कवितेतून वस्तूस्थिती मांडली. न्यायाधीश श्रीमती खान म्हणाल्या, पुरूष आणि स्त्री असा भेदभाव न करता एकसमान पहायला हवे. स्त्री ही पुरूषाच्या एक पाऊल पुढे आहे. ती सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. घरची जबाबदारी सांभाळून नोकरी सक्षमपणे करत आहे. न्यायाधीश श्रीमती बेहरे यांनीही यावेळी कौतुकास्पद कार्यक्रम केल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. वकील प्रतिभा भोसले-निंबाळकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास महिला आणि पुरूष वकील तसेच कर्मचारी उपस्थित होते.