नाबार्डचे केडीसीसी बँकेला ५७ लाखांचे अर्थसहाय्य
कोल्हापूर/प्रतिनिधी : नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्यालीतील दुर्गम भागांतील खातेदारांना बॅंकिंग व एटीएम सुविधा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता रु.४५ लाख तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट कार्ड सुविधेपोटी रु.१२ लाख याप्रमाणे एकूण रु.५७ लाखाचे नाबार्डकडून अर्थसहाय्य जमा झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.
नाबार्डकडून आर्थिक समावेशन निधी (Financial Inclusion Fund) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांवर तसेच शाखा नसलेल्या गावांमधून बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल व्हॅन करिता बॅंकेस अर्थसहाय्य दिलेले आहे. तसेच ग्राहकांना रुपे डेबिट कार्डद्वारे कोणत्याही एटीएम मधून रक्कम काढणेची सुविधा उपलब्ध करुन दिली असून यापोटी नाबार्डने आर्थिक समावेशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा बँकेला हे अनुदान दिलेले आहे.
जिल्हा बॅंक तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असून मोबाईल बॅंकिंग सारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांस दिल्याने नाबार्डने बॅंकेबद्दल गौरव उदगार काढले असून बॅंकेने कोल्हापूर जिल्ह्यात गाव तेथे बॅंकेची शाखा या धर्तीवर मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित करणेचे निश्चित केले आहे. याकरिता जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या – वस्त्यांमध्ये ५०० मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा पुरविली जाणार आहे. याकरिता नाबार्डकडून ३०० मायक्रो एटीएमसाठी रु ६७ लाखाचे अर्थसहाय्य दिले जाणार असून लवकरच मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे अशी माहितीही श्री. माने यांनी दिली.
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने बँकेने यशाचे अनेक टप्पे यशस्वीरीत्या पार केले आहेत.