शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उजळला रायगड – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडला रोज पुष्पहार अर्पण
मुंबई/प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगड पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजाळून निघाला. अनेक दिवस अंधारात असणार्या वास्तू प्रकाशमान झाल्या. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तूंना रंगीबेरंगी रोषणाईने वेगळी झळाळी मिळाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी रायगडवरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो काही फंड लागेल तो मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका, अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार बुधवारी रायगडवर डॉ. शिंदे यांच्या मार्फत विद्युत रोषणाईचे साहित्य पोहच झाले. आणि बघता बघता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रायगड प्रकाशमान झाला. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुरातत्त्व विभागाने दिले.
रायगडवर आता रोज पुष्पहार अर्पण
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर, होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. हा संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होईल.