सी.पी.आर मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी त्वरित सुधराव्यात भाजपाची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीमध्ये दहा चिमुकल्यांचे निष्पाप बळी गेले. अशा प्रकारची दुर्घटना सी.पी.आर मध्ये घडू नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. एस. एस मोरे यांची भेट घेऊन सी.पी.आर मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी व काही दिवसांपूर्वी कोरोना कक्षातील झालेल्या दुर्घटने संदर्भात फायर ऑडीट व इलेक्ट्रिकल ऑडीट बाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, भंडारा सारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, असे न होता सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडीट व इलेक्ट्रिकल ऑडीट नियमित होणे गरजेचे आहे. सी.पी.आर मधील कोरोना वॉर्डला आग लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सी.पी.आर चे फायर ऑडीट व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीचे लेखी उत्तर देखील सी.पी.आर प्रशासनाने अध्याप दिलेले नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिणीस विजय जाधव यांनी सी.पी.आर मधील कोरोना कक्षातील फायर ऑडीट संदर्भातील अहवालाची मागणी केली. तसेच फायर ऑडीट होऊन देखील अध्याप यामधील त्रुटींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, गोर-गरिब जनतेचे आधारवड असणाऱ्या या सरकारी रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीची दुःखद घटना पुन्हा घडू नये याकरिता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक विजय बर्गे यांच्या समवेत भाजपा शिष्टमंडळाने सी.पी.आर मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागास भेट देऊन या विभागाची झालेली दुरावस्था, तसेच नवजात शिशूंना ठेवण्यासाठी असणाऱ्या वॉर्मर मध्ये क्षमते पेक्षा जास्त शिशु ठेवल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे डॉ.एस.एस.सरवदे उपस्थित होते. तसेच शिष्टमंडळाने सी.पी.आर मधील अपघात विभागाला भेट दिली असता तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. अपघात विभागातील अस्वच्छता, रुग्णांची होणारी गैरसोय हे अधिष्ठाता डॉ. एस.एस मोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व त्रुटींची सुधारणा त्वरित व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. फायर ऑडिटच्या अहवालातील सर्व त्रुटी गंभीर असून त्याचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या त्वरित सुधाराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी शिष्टमंडळात सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, विजय आगरवाल, चिटणीस सुनीलसिंह चव्हाण, अक्षय निरोखेकर, कृष्णा आतवाडकर, सिद्धार्थ तोरस्कर ई. उपस्थित होते.