छत्रपती शिवरायांनी जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार
कागल/प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. त्यामुळे शिवराज्याभिषेक म्हणून ओळखला जाणारा हा दिवस यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाईल, असेही ते म्हणाले.सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर केलेल्या शासन निर्णयाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार कागल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने झाला.
यावेळी भाषणात बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, यापुढे सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करूया. या दिवशी ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांवर भगवी गुडी मोठ्या दिमाखात फडकेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, कार्य आणि इतिहास यावर आधारित विविध कार्यक्रमांच्या रूपाने खऱ्या अर्थाने लोकजागर करूया. जनतेचे राज्य कसे चालवावे याचा वस्तुपाठच छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे, असे सांगताना श्री मुश्रीफ म्हणाले, सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र संघटित करून उत्तुंग कार्य कसे निर्माण करता येते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांची मदत, स्त्रियांचे संरक्षण, पर्यावरणाचे रक्षण, निकोप न्याय व्यवस्थेबरोबरच अपराध्यांना कडक शासन याबद्दल दिलेली आज्ञापत्रे आजही अनुकरणीय आहेत, असे ते पुढे म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सहा जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा पातळीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार आयोजित केला जाईल.
यावेळी सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आनंदराव पसारे, नाना बरकाळे, दीपक मगर, शशिकांत भालबर, महेश मगर, प्रकाश जाधव, विक्रम चव्हाण, संग्राम लाड, अरविंद लाड, सतीश पोवार, सतीश घाडगे, उमेश तोडकर, राहुल माने, अक्षय भोसले, मंगेश पोवार, संग्राम कोराने, सनी मोहिते, दिनेश तिवारी, निशांत जाधव, राजू रजपूत, ऋषिकेश चव्हाण, संजय चव्हाण, अमित पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक नितीन काळबर यांनी केले.
चौकट….
२४ ला लाल महालात सत्कार…..
माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे म्हणाले, ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय निश्चितच ऐतिहासीक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्याबद्दल येत्या २४ जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालामध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांचा मराठा समाजाच्या वतीने कृतज्ञतापर सत्कार होणार आहे.