७ व्या आर्थिक गणनेसाठी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांचे आवाहन
कोल्हापूर, दि.२२ (जिल्हा माहिती कार्यालय) : लॅाकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली ७ व्या आर्थिक गणनेचे काम सुरू करण्यात येत आहे. सातव्या आर्थिक गणनेमध्ये आर्थिक कार्यात गुंतलेल्या जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना/नागरीकांना आपल्यास भेट देणा-या प्रगणकाला माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे काम हाती घेण्यात येत आहे. या गणनेद्वारे देशामध्ये कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती गोळा करण्यात येते. या गणनेद्वारे घरगुती उद्योगांसहीत देशातील सर्व सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या वस्तू निर्माण व सेवा क्षेत्रातील आस्थापनांची अद्यावत माहिती प्राप्त होणार असून ती देशाच्या विकास योजनांच्या नियोजनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत सहा आर्थिक गणना झाल्या असून शेवटची गणना २०१३ साली पूर्ण करण्यात आली आहे. यावेळच्या गणनेमध्ये भारत सरकाचे सांख्यिकी मंत्रालय, केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंगीकृत सीएससी ई गव्हर्नन्स सर्विसेस लि. व राज्य शासन यांचा सहभाग असणार असून प्रथमत:च या गणनेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून ही गणना तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
कॉमन सर्विस सेंटरचे प्रत्येक गावातील गाव पातळीवरील प्रतिनिधींतंर्गत नियुक्त प्रगणकांमार्फत मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणे, केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागामार्फत तसेच राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत त्याचे ॲपद्वारेच पर्यवेक्षण करणे ही यावेळची विशेष वैशिष्ट्ये आहेत. गणनेचे क्षेत्र काम वेळेत व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी देश, राज्य व जिल्हा पातळीवर समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
गणनेची कालबध्द अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडील २१ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत सीएससीने सभागृहास सादर केलेल्या अहवालाप्रमाणे ग्रामीण भागात २६७ ग्रामपंचायती व शहरी ४० आयव्हीमध्ये अध्याप काम सुरू झालेले नाही. मार्च २०२० रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये संपूर्ण देशात लॅाकडाऊन करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील ७ व्या आर्थिक गणनेचे काम स्थगित करण्यात आले होते.
शहरी भागात काम करताना नागरीक माहिती देण्यास नकार देत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्तांना ७ व्या आर्थिक गणनेच्या कामात सहकार्य करण्याबाबत सूचित करून सीएससीला वॅार्ड ऑफिसर यांच्याशी समन्वय साधून कामास सुरूवात करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी इचलकरंजी, कागल, हातकणंगले मुख्याधिकाऱ्यांनी कामात येणा-या स्थानिक अडचणीत लक्ष घालून ७ व्या आर्थिक गणनेच्या कामात सहकार्य करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.