शहरातील प्रत्येक प्रभागात बाल सरंक्षण समिती स्थापन करावी अवनी संस्थेची मागणी
कोल्हापूर /प्रतिनिधी : १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार तसेच मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम १०६ नुसार कोल्हापूर शहरात प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या अवनी संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबातचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपआयुक्त निखिल मोरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की अवनी संस्था गेली २५ वर्ष अनाथ,निराधार ,शिक्षणापासून वंचित ,कचरावेचक कुटुंबातील मुलांच्यासाठी काम करत आहे.दरम्यान अविनी संस्थेमार्फत कचरावेचक कुटुंबातील मुलांसाठी अभ्यासिका,डे केअर सेंटर ,मोबाईल लायब्ररी असे उपक्रम वडणगे, फुलेवाडी ,राजेंद्रनगर, यादवनगर मुडशिंगी रेंदाळ ,विचारेमाळ येथील मुलांसाठी राबविण्यात येत आहेत. तसेच त्यांचे बाल अधिकार मंच स्थापन करण्यात आले आहे.तर कोरोनामुळं मुला – मुलीं वर होणारे लैंगिक शोषण ,बालविवाह, माराहण ,स्थलांतर या समस्यांचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे या गंभीर समस्यांवर बाल संरक्षण समिती स्थापन होणे अंत्यत महत्त्वाचे आहे.
यावेळी १० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार तसेच मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम १०६ नुसार कोल्हापूर शहरात प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात यावी ,पूर्वी स्थापन असलेल्या बाल संरक्षण समितीचे सक्षमीकरण करण्यात यावे,बाल संरक्षण समितीमधील सदस्यांचे आॅनलाईन किंवा आॅफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे,या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अवनी संस्थेचे बाल अधिकार मंच केडर राजवर्धन बन्ने,वनिता कांबळे,मेघा पुजारी,अन्नपूर्णा कोगले,अल्निसा गनिभाई,किरण नाईक, अविनाश शिंदे उपस्थित होते.