पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील – मंत्री जयंत पाटील यांचा विश्वास, गडहिंग्लजमध्ये प्रचाराची सांगता
गडहिंग्लज/प्रतिनिधी :
विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडीच्या विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून भाजपवाले देव पाण्यात घालून बसलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि शिवसेनेने हातात हात घालून सरकारचे एक वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केले. या विधान परिषदेच्याही सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्यानंतर भाजपला समजेल की महाविकास आघाडीचा प्रभाव जनतेवर किती आहे.
गडहिग्लजमध्ये विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मंत्री श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, याआधीच्या सरकारच्या शेवटच्या काळात शिक्षण संस्थांसाठी देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्या. परंतु; आर्थिक तरतूद मात्र काही केली नाही. त्यामुळे शैक्षणिक प्रश्न तसेच पडुन राहीले.
माजी आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, महाविकास आघाडीमुळे अरुण लाड व जयंत आसगावकर यांचा विजय निश्चित आहे. परंतू, गाफील राहू नका.प्रा. किसनराव कुराडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, डॉ. संग्रामसिंह नलवडे, संग्रामसिंह कुपेकर , यांचीही भाषणे झाली.
स्वागत सिद्धार्थ बने यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर यांनी केले. सुत्रसंचलन अशपाक मकानदार यांनी केले. आभार गुंडेराव पाटील यांनी मानले.
व्यासपीठावर माजी आमदार संध्याताई कुपेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, बाळासाहेब कुपेकर, वसंतराव यमगेकर, शिवाजीराव खोत, दिलीप माने, केडिसीचे संचालक संतोष पाटील, अमर चव्हाण, श्रेया कुणकेकर, वनश्री चौगले, रामराजे कुपेकर, संग्रामसिंह नलवडे, भिकू गावडे, सुनिल शिंत्रे, विद्याधर गुरंबे, सोमगोंडा आरबोळे, बसवराज आजरी, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, नगरसेविका शुभदा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट…….
ते सैरभैर झालेत……..
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारमध्ये असूनही भाजपने शिवसेनेला दुय्यम स्थान दिले. भाजपवाल्यांच्या तोंडाला सत्तेचे रक्त लागले होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याचा छुपा अजेंडा काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे उधळला गेला. त्यामुळे भाजपवाले सैरभैर झालेत