कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लिहिले पत्र
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून आपण सर्वजण सज्ज राहूया, अशा सूचना ग्रामविकास अधिकारी हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरोनायोद्धे म्हणून लढणाऱ्या सर्व पातळ्यांवरील अधिकाऱ्यांना श्री. मुश्रीफ यांनी पत्र लिहून लढण्यासाठी पाठबळ देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे, सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मला आढावा बैठक घेवून तुम्हा सर्वांना सूचना देता येणार नाहीत. त्यामुळे माझ्या भावना मी या पत्रातून मांडत आहे. आचारसहिता संपताच आपण सर्वजण मिळून पुन्हा नियोजनबद्धरित्या जोमाने काम करूया.
अलीकडचे काही दिवस कोरोना महामारीचे संकट कमी झालेले असून बाधितांची संख्याही रोडावलेली आहे. ही बाब निश्चितच सुखावह आहे. परंतु युरोपीय राष्ट्रामध्ये, अमेरिकेमध्ये तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनावर औषध येईपर्यंत आपण सर्वानी खबरदारी घेतलीच पाहिजे. आपण पुन्हा या विषाणू बरोबरच्या युद्धाला सज्ज राहीले पाहिजे. गाफील राहू नका. टेस्टिंग वाढवा, कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये ढीलाई करू नका.
आचारसंहितेमुळे मला कोरोना आढावा बैठक घेथून तुम्हास सूचना देता येणार नाहीत. परंतु; आचारसंहितेनंतर पुन्हा आपण बघूच. तालुक्यामध्ये फक्त १२ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. तेही होम ऍडमिट आहेत. कोविड केअर सेंटर सर्व ठिकाणी आहेत. तालुका कोरोना मुक्तीसाठी तुमचे अभिनंदन. परंतु; दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहून कोरोना पूर्णपणे गाडून टाकूया!
चौकट….
कोरोनायोद्ध्यांचे कौतुक
मंत्री मुश्रीफ यांनी कोरोना योद्धे म्हणून लढणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पत्रात कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे. तुम्ही सर्वच तालुक्यांचे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांचे कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते यांनी गेली नऊ महिने जी अथक मेहनत घेतली, कठोर परिश्रम घेतले. जिवावर उदार होवून कोरोनाग्रस्तांची सेवा असेल किंवा महामारी रोखण्यासाठी जी जी जबाबदारी दिली गेली, ती फारच तळमळीने पार पाडली. याचे हे सर्व श्रेय आहे. तुम्हा सर्वाना लाख-लाख धन्यवाद! तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु; ही लढाई अजून संपलेली नाही. सणामुळे हे संक्रमण वाढलेले आहे. तसेच, दिल्ली, अहमदाबाद, केरळ, इत्यादी राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. काही ठिकाणी दुसरी लाट, काही ठिकाणी तिसरी लाट येवून अनेक ठिकाणी कर्फ्यू, लाकडाऊन सुरू केले आहेत.