धातू तंत्र पत्रिका धातू उद्योगासाठी उपयुक्त
– रणजित शहा, दिवाळी अंकाचे प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : धातू उद्योगातील प्रत्येक घटकासाठी धातू तंत्र पत्रिका या मासिकाचा उपयोग होईल, असे मत कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शहा यांनी आज व्यक्त केले.
येथील धातू तंत्र प्रबोधिनी असोसिएशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या धातू तंत्र पत्रिकेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री. शहा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. शहा म्हणाले, या उद्योगामध्ये अनेक जण हे कामगाराचे मालक झाले आहेत. त्यांना आपल्या मातृभाषा, मराठीत समजेल अशी तांत्रिक माहिती देणाऱ्या मासिकाची गरज या निमित्ताने पूर्ण होत आहे. या निमित्ताने शीटमेटलसंबंधी माहितीचा अंतर्भाव या अंकामध्ये करता येईल, का त्याकडेही लक्ष द्यावे.
शासकीय तंत्रनिकतेनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी अशा स्वरूपाच्या अंकाची गरज स्पष्ट केली. कार्यकारी संपादक बाबासाहेब खाडे यांनी या अंकात असणाऱ्या विविध विषयांची माहिती दिली. ते म्हणाले, घडामोडी यामध्ये धातू क्षेत्रातील उद्योगिनी या लेखामध्ये कोल्हापुरातील या क्षेत्रातील महिलांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन, तांत्रिक, गुणवत्ता, रंजक आणि उत्पादन परिचय या माध्यमातून या क्षेत्रातील जाणकारांनी मार्गदर्शन केले आहे.
उपसंपादक रूपा रायचूर यांनी स्वागत केले, तर संपादक शशांक मांडरे यांनी प्रास्ताविकमध्ये अंक सुरू करण्यासंबंधी भूमिका स्पष्ट केली. उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमासाठी नलिनी नेने, अनंत वैद्य, देवदत्त आद्री, अभिजित कोपार्डे, डॉ. सौ. श्रद्धा मांडरे, सूरज महाजन, अड. गीतांजली सावळे आदी उपस्थित होते. दरम्यान, अंकासंबंधी अधिक माहितीसाठी पार्वती मल्टिप्लेक्सशेजारील शीतल चेंबर्स येथे असणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.