कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : कोल्हापूर शहरात एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लोक सुरक्षेसाठी दूरसंचार सेवा (इंटरनेट) तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्याबाबतचे नियम, 2017 अन्वये कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा दिनांक 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दिनांक 8 जून 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 31 तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी पारित केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मात तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे (Social Media) याद्वारे प्रसारित करुन जिल्ह्यात सामाजिक अस्थिरता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश पारित करण्यात आला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
00000