नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये -महापौर सौ. निलोफर आजरेकर‘- मास्क नाही- प्रवेश नाही, मास्क नाही -वस्तूही नाही’ उपक्रमाला गती देण्याचे निर्देश
कोल्हापूर/प्रतिनिधी : नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये तसेच शहरातील दुकानामध्ये मास्क नाही- प्रवेश नाही, मास्क नाही –वस्तूही नाही, या उपक्रमाला अधिक गती देण्याचे निर्देश महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.
कोव्हिड- १९ वर नियंत्रणासाठी काल राज्य शासनाने सर्व महापालिकांना मास्क वापराबाबत जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मास्क नाही- प्रवेश नाही, मास्क नाही –वस्तूही नाही हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविला जात असून नागरिक तसेच व्यापारी-व्यावसायिकांकडूनही या उपक्रमास चांगला प्रतिसादही मिळत आहे. यापुढेही व्यापारी-व्यावसायिक, फळ आणि भाजीविक्रेते, तसेच नागरिकांनी मास्क नाही- प्रवेश नाही, मास्क नाही –वस्तूही नाही, हा उपक्रम अधिक व्यापकतेने राबविण्याचे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यांनी केले आहे.
लॉकडाऊन उठविल्यानंतर नागरिक उद्योगधंदे, व्यापार, व्यवसायासाठी मोठया प्रमाणात बाहेर पडत आहेत, विशेषत: नागरी भागातील नागरिक बाहेर पडतांना मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करतांना दिसत नाहीत, त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका विचारात घेऊन शासनाने नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे.
कोल्हापूर महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क नाही- प्रवेश नाही, मास्क नाही –वस्तूही नाही, हा उपक्रम हाती घेतला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अधिक गतीमान केला आहे, यासाठी महापालिकेने 30 पथके तैनात केली असून शहराच्या विविध भागात मास्क न वापरणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दीत न जाणे याबाबी कटाक्षाने पाळाव्यात, शहरातील भाजी – फळ विक्रेते तसेच दुकानदार, व्यापारी-व्यावसायिकांनी स्वत: मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय आणि सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय वस्तू देऊ नयेत, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.
तरी शहरातील नागरिकानी कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी बाहेर पडतांना मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करावा, तसेच नागरिकांनी या उपक्रमात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.