गीता पाटील यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर/प्रतिनिधी : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाची ( ता. हातकणंगले ) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका गीता गणपतराव पाटील यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात गीता पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिरोली पुलाची सारख्या ग्रामीण भागामध्ये अल्प फीमध्ये सीबीएसई पॅटर्नच्या दर्जेदार शिक्षणाची संधी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानाने परिपूर्ण करणारे विविध उपक्रम, विविध बाह्य परीक्षा, कला व क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससी सारखे अद्यावत तंत्रज्ञान परिपूर्ण शिक्षण आणि विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलची वैशिष्टय आहेत.
गीता पाटील यांच्या कार्याची दखल मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी पुणे यांनी घेतली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गीता पाटील यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित केले. पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते गीता पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विघ्नेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार महेश लांडगे व किसन लांडगे, मिशन गेम्स ऑलिंपिक असोसिएशन, इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय साळुंखे, प्रा. पै. अमोल साठे, पल्लवी शिंदे, विनोद शिंदे, विमल देसाई, सागर पवार, विशाल देसाई आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराजांच्या नावे मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे. पालकांचा विश्वास आणि शिक्षकांची साथ यामुळेच शाळेत विविध उपक्रम यशस्विनी राबवणे शक्य झाल्याचे गीता पाटील यांनी सांगितले.