दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू – श्री.राजेश क्षीरसागर
हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने घेतली श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच याशहराशेजारील गावांचा विकास होवून शैक्षणिक, वैद्यकीय सेवेसह मुलभूत सोयी सुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या आहेत. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे. विरोधाला विरोध करून कोणत्याही समस्येचा मार्ग निघू शकत नाही. दोन्ही समित्या या कोल्हापूर जिल्ह्यातीलच असून, विकासाच्या बाजूने एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही समित्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून त्यांची संयुक्तिक समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील आहे. हद्दवाढ विरोधी समितीच्या मागणीप्रमाणे प्रस्तावित हद्दवाढीचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांना भेटून या विषयावर सकारात्मक तोडगा काढू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांमधील सर्व पक्षीय कृती समिती, कोल्हापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
यावेळी भूमिका मांडताना हद्दवाढ विरोधी समितीचे राजू माने म्हणाले, गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. हद्दवाढीस समितीचा विरोध नाही. पण, प्रस्तावित गावातील लोकांची भूमिका समजून न घेता होणाऱ्या हद्दवाढीस या गावांचा विरोध आहे. सद्या प्रस्तावित हद्दवाढीतील अनेक गावांनी गाव बंद आंदोलनाची चळवळ सुरु केली आहे. यामुळे शहरासह गावातील नागरिकांचेही नुकसान होत आहेच. पण, निर्णय लादला जाण्याच्या शक्यतेमुळे हा विरोध तीव्र होत आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी इतर विकसित झालेल्या शहरांचा अभ्यास करून ग्रामीण भागातील जनतेसमोर आराखडा सादर करावा, हीच समितीची प्रमुख मागणी असल्याचे सांगितले.
यावर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेवूनच हा प्रश्न सुटणार आहे. हद्दवाढी शिवाय विकास होणार नाही, हे सत्य आहे. विकास झाल्यास शासनाकडून निधी मंजूर करून गावांचाही विकास व्हावा. ग्रामीण भागातील जनतेलाही शहराप्रमाणे मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही बाब चुकीची आहे. शांत विचाराने विचारांची देवाणघेवाण करून दोन्ही समित्यांची संयुक्तिक बैठक होणे गरजेच आहे. हद्दवाढ झाल्यास आवश्यक निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा निर्णय व्हावा. नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये या करिता दोन्ही समित्यांनी टोकाची भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. लवकर मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेवून दोन्ही बाजूची भूमिका त्यांच्या समोर मांडू. यासह हद्दवाढीचा आराखडा सादर करण्याबाबतही चर्चा करून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू, असे सांगितले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विभागप्रमुख मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, रुपेश इंगवले, कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावांमधील सर्व पक्षीय कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्ह्त्रे, शशिकांत पाटील, गजानन संकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.