१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’
कोल्हापूर/प्रतिनिधी : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अॅडल्ट कॅामेडी या प्रकारात मोडणारा हा चित्रपट तरुणाईचं त्यांच्या भाषेत मनोरंजन करणारा आहेच, इतर वयोगटातील प्रेक्षकांनाही काही ना काही देणारा आहे. टिझर, मोशन पोस्टर आणि गाण्यांच्या माध्यमातून दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक २’नं प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचं काम केलं आहे.
या चित्रपटाची कथा गण्या, श-या आणि चंदू या तीन मित्रांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. त्यांच्यात चालणारी थट्टा-मस्करी, धमाल, विनोद करता करता एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ‘टकाटक २’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘टकाटक २’चं कथानक प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्याचं काम करणार आहे. मुद्देसूद पटकथा लेखन आणि त्याला अनुरूप संवादलेखन ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांचा उत्तम अभिनय हे ‘टकाटक २’ मुख्य वैशिष्ट्य आहे. गीत-संगीताच्या बाबतीतही हा चित्रपट रसिकांचं मनोरंजन करणार आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटातही मिलिंद कवडे यांनी रसिकांची आवड जोपासत गाण्यांचा समावेश केला आहे. ‘घे टकाटक दे टकाटक…’ आणि ‘लगीन घाई…’ या गाण्यांच्या जोडीला ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतसाज चढवला आहे. नेत्रसुखद लोकेशन्सवर करण्यात आलेली सुरेख सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा समावेश या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम करतो.
‘टकाटक २’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून, मनोरंजनातून एक विचार पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं मिलिंद कवडे म्हणाले. हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी नसून, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी आहे. या चित्रपटाची केवळ भाषा तरुणाईला समजेल अशी आहे. त्यामुळे याचा अॅडल्ट कॅामेडी असा उल्लेख करण्यात येत आहे. ‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’च्या माध्यमातून एक संगीतमय कलाकृती प्रेक्षकांच्या सेवेत रुजू करण्याचा आमच्या संपूर्ण टिमचा प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून, संकल्पनाही त्यांचीच आहे. संवादलेखानाचं काम किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी चोख बजावलं असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. छायांकन हजरत शेख वली यांनी केले असून निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.