१५ ऑगस्टपासून विद्यापीठाची नवी ध्वनी-मालिका “अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना सुरू होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिव-वार्ता’ या दृकश्राव्य युट्यूब वाहिनीपाठोपाठ शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क कक्ष आता ‘शिव-वाणी’ ही युट्यूब ध्वनी- वाहिनी सादर करीत आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या वाहिनीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या ध्वनी-वाहिनीद्वारे आजादी का अमृतमहोत्सव अर्थात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना!’ ही एक विशेष ध्वनी- मालिका सादर करण्यात येणार आहे. अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या ध्वनी-मालिकेतील भाग-१ – स्वातंत्र्यसैनिक दत्ताजीराव जाधव यांचे कार्य यावर असणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण या मालिकेमधून करण्यात येणार आहे. रोज सकाळी ९ वाजता स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे व योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांची ही संयुक्त प्रस्तुती आहे. या मालिकेची सुरवात शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील स्वातंत्र्यसैनिक कै. दत्ताजीराव जाधव यांच्या कार्याच्या माहितीने दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.सदर भागाची लिंक पुढे देण्यात येणार आहे. तो आपण ऐकावाच, पण त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाची ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनी आणि नवी ‘शिव-वाणी’ युट्यूब ध्वनी-वाहिनीही सबस्क्राईबही करा असे आवाहन करण्यात आले आहे.