पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करा – आमदार जयश्री जाधव
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना सूचना – स्मशानभूमीची केली पाहणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिली.पंचगंगा स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छतावरील पत्रे तुटल्याची माहिती मिळताच, आमदार जयश्री जाधव यांनी आज दुपारी अचानक स्मशानभूमीला भेट दिली. स्मशानभूमीची पाहणी करून, त्यांनी थेट प्रशासक बलकवडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. स्मशानभूमीचे दुरावस्था झाली असताना, महापालिकेने त्याकडे केलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. छताच्या पत्र्यांमधून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळते. पाऊस सुरू आहे. त्यामुळे अंत्यविधीवेळी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे स्मशानभूमीच्या छताची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.
येत्या दोन दिवसात स्मशानभूमीची दुरुस्ती करून घेण्यात येईल असे बलकवडे यांनी सांगितले.
तसेच स्मशानभूमी देखभाल-दुरुस्ती विभागाचे उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्याशीही आमदार जाधव यांनी मोबाईलवर संपर्क साधला व स्मशानभूमीची दुरुस्ती लवकरात लवकर झाली पाहिजे. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले.