विकास कामाच्या बाबतीत ठेकेदारांची मनमानी खपवून घेवू नका : श्री.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतला मंजूर निधी, प्रस्तावित आराखडे, योजना, विकासकामांचा आढावा
कोल्हापूर /प्रतिनिधी : शासनाकडून निधी मंजुरीसाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत असताना, निधी मंजूर होवूनही बहुतांश कामे आजतागायत प्रलंबित असल्याचे दिसून येते. चार महिन्यापूर्वी ठेकेदारांना वर्क ऑर्डर देवूनही कामास सुरवात केली जात नसेल तर हे महापालिका प्रशासनाचे अपयश असून, अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुभेमुळेच ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण न करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे विकास कामे थांबून त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. विकास कामांच्या बाबतीत ठेकेदारांची मनमानी खपवून घेवू नका, काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मंजूर योजना, निधी, प्रस्तावित आराखडे, विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
या बैठकीच्या सुरवातीस रंकाळा तलावास मंजूर झालेला निधी, नगरोत्थान निधी, कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रस्ताव, प्रभाग रचना, नगरविकास विभागाचा रु.१५ कोटींचा निधी, कावळा नाका येथील एम.एस.आर.डी.सी. जागा, थेट पाईपलाईन योजना, पंचगंगा प्रदूषण, जयप्रभा स्टुडीओ जागा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फुटबॉल थीम पार्क, फुटबॉल आयलँड, के.एम.टी.कर्मचारी प्रश्न, सिद्धार्थनगर पूरसंरक्षक भिंत, पूर नियंत्रण रेषा, ख्रिश्चन समाज दफनभूमी जागा, शहरातील पाणीपुरवठा, नगररचना विभागातील प्रलंबित बांधकाम परवाने आदी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी सूचना देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गांधी मैदानाच्या सांडपाणी निचरा होण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. केलेल्या आराखड्यानुसार अतिवृष्टीमध्ये सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही याची तंतोतंत दखल घ्या, आवश्यक असल्यास वाढीव निधीचा प्रस्ताव सादर करा. नगरोत्थान मंजूर निधीस महापालिका हिस्सा म्हणून मुंफ्रा मधून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेचे काय झाले. हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे काय? निवडणुका लांबणीवर पडणार असतील तर नगरविकास विभागाला स्मरणपत्र द्या, याविषयी नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे सकारात्मक पाठपुरावा करू. ख्रिश्चन समाजास दफनभूमी करिता मंजूर केलेली जागा दफनविधीच्या दृष्टीने योग्य आहे का? या जागेबाबत समाज सकारात्मक आहे का? नगरविकास विभागाकडून मंजूर निधीतील अनेक कामे अजून सुरु करण्यात आलेली नाहीत. ठेकेदाराला वर्क ऑर्डर देवूनही काम होत नसेल तर अशांना पाठीशी न घालता थेट कारवाई करा. नवीन निधी आल्यानंतर जुन्या निधीतील कामे प्रलंबित दिसता कामा नयेत. कावळा नाका येथील एम.एस.आर.डी.सी.च्या जागेबाबत नगरविकास मंत्री महोदयांनी विचारणा केली होती. सदर जागा हेरीटेज मधून वगळून किंवा धरून असे दोन्ही प्रस्ताव शासनास सादर करण्याची प्रक्रिया करावी. थेट पाईपलाईन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे हे अभिनंदनीय आहे. पण, या योजनेत भ्रष्टाचार होवून जादाची बिले दिले गेल्याचे निदर्शनास आले होते. त्या रक्कमेची रिकव्हरी झाली का? पुन्हा असा घोळ होणार नाही यांची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. पंचगंगा प्रदुषणाचा विषय पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्यजी ठाकरे यांनी गांभीर्याने घेतला असून, पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. तसेच एस.टी.पी. प्लांटचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. जयप्रभा स्टुडीओच्या जागेबाबत खरेदीदार पर्यायी जागा स्वीकारण्यास तयार असताना अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. महापालिका जागा देण्यास असमर्थ असल्यास शासन स्तरावर जागा घेवून ती कलाकारांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. महापालिकेस मंजूर निधीमध्ये राजकीय सोयरिक खपवून घेतली जाणार नाही. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी. अमृत योजनेतील उर्वरित ४२ टक्के कामाची सुरवात कधी होणार? योजना अर्ध्यातच सोडलेल्या ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई करून सदर योजनेतील उर्वरित काम तात्काळ सुरु करावे. नगरविकास विभागाच्या बांधकाम परवानग्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. याकरिता विशेष कॅम्प आयोजित करून नागरिकांना न्याय द्यावा. के.एम.टी. कर्मचाऱ्याच्या थकीत रक्कमेतील रक्कम तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. तसेच सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याकरिताची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. फायरमन ठोक मानधनाबाबत महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यासाठी प्रस्तावाची प्रत देण्याबाबत सूचना केल्या.
या बैठकीस उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उप -आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक मस्कर, कनिष्ठ अभियंता हर्षजीत घाटगे, के.एम.टी.चे मंगेश गुरव वॉर्ड अधिकारी दबडे, घाटगे, एन.एस.पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.