कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारांना गुढी पाडव्यानिमित्त १०४ घरकुले भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना घरकुलाच्या रुपाने गुढी पाडव्याची भेट दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १०४ बांधकाम कामगारांना स्वतःची हक्काची घरकुले मिळणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ही घरकुले बांधून मिळणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांचे राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने विविध ३० हून अधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच बांधकाम कामगारांना दोन लाख रुपयांचे घरकुल ही एक अत्यंत महत्त्वकांक्षी कल्याणकारी योजना आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना या नावाने ही योजना कार्यरत आहे.
याबाबत बोलताना कामगारमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जो बांधकाम कामगार दुसऱ्यांच्या घरांचे छत बांधत असतो, त्याचा संसार मात्र सदैव उघड्यावरच असतो. बांधकाम कामगाराच्या घराचे छत बांधण्याची जबाबदारी कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने उचलली आहे. या माध्यमातून त्यांचाही संसार फुलावा व समृद्ध व्हावा, ही भावना घेऊन अटल बांधकाम कामगार आवास योजना कार्यरत केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी तालुकानिहाय मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या अशी कागल ४७ , राधानगरी १५, भुदरगड सात, आजरा सहा, गडहिंग्लज १०, चंदगड एक, करवीर सात, शाहुवाडी एक, पन्हाळा नऊ, गगनबावडा एक अशी आहे.
“अशी आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना”
बांधकाम कामगाराच्या नावे स्वतःची जागा असायला हवी. तसेच; आई-वडील अथवा पती-पत्नीच्या नावे असल्यास संमतीनेही बांधकाम करता येते,त्याच्या नावे महाराष्ट्रभर पक्के घर नसावे,२६९ चौरस फुटांच्या आकाराचे मिळणार घरकुल.