जयप्रभा स्टुडिओसाठी कोल्हापूर करांचे साखळी उपोषण सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : जयप्रभा स्टुडिओ कलाकारांसाठीचं राहिला पाहिजे. यासाठी प्रसंगी झोळी घेऊन कोल्हापुरातून भीक मागू अशी भावना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कोल्हापुरातील नागरिकांनी आजच्या साखळी उपोषणावेळी व्यक्त केली.जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सुरू होणार नाही.आणि तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर शहर नागरी कृती समिती व कोल्हापूर मधील नागरिकांनी घेतला आहे.
कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री २ वर्षापूर्वीच झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या स्टुडिओची खरेदी शहराचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता या प्रकरणामुळ कोल्हापुरातील वातावरण चांगलेचं तापले आहे. शहरात जयप्रभाच्या विक्री विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. आजपासून जयप्रभा स्टुडीओ समोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीन साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. जो पर्यंत स्टुडिओची जागा परत मिळत नाही आणि याठिकाणी सिनेमाचे शूटिंग सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूचं राहणार असल्याचे कलाकारांनी सांगितले. आजपासून सुरु झालेल्या उपोषणात अनेक संघटनांनी, कोल्हापूरातील कृती समिती आणि माजी नगरसेवकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. जयप्रभा स्टुडिओ ही आमची अस्मिता असून हा स्टुडीओ जो पर्यंत कलाकारासाठी खुला होत नाही तो पर्यंत चित्रपट महामंडळाचा लढा सुरुच राहणार असल्याचे यावेळी कलाकारांनी सांगितले. दरम्यान आजच्या उपोषणामध्ये माजी नगरसेवक देखील सहभागी झाले होते. श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपीने ही जागा खरेदी केली असली तरी विना अट त्यांनी ही जागा सोडावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर माजी आमदार क्षीरसागर यांनी याबाबत मोठ मन करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. साखळी उपोषणामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक सतीश बिडकर, रणजीत जाधव, रवि गावडे, माजी नगरसेविका सुरेखा शहा, यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे सदस्य, माजी नगरसेवक, कलाकार सहभागी होते.