महिला बचत गट व फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत मागणीसाठी मुदाळतिट्ट्यावर रस्ता रोको
कोल्हापूर/सरवडे/प्रतिनिधी : महिला बचत गट व फायनान्स कंपन्याकडून घेतलेली कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लॅक पँन्थरच्या वतीने मुदाळतिट्टा ता.कागल येथे रस्ता रोको करत मागण्याचे निवेदन मुरगुड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक विद्या जाधव यांना देण्यात आले.आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्य माणसाला कर्जासाठी दारात सुध्दा उभा करून घेत नाहीत. त्यामुळेच सामान्य कुंटूंबीतील लोक खाजगी सावकार ,फायनान्स कंपन्या व बचत गटांच्या मधून आपल्या गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतात. यामध्ये
शेतमजूर, भूमिहीन, गवंडी, सेंट्रीग काम करणारे मजूर,रिक्षावाले, मोलकरीण आदि सामान्य माणसाचा सहभाग आहे.फायनान्स करणाऱ्या बहुतांश कंपन्या ह्या कर्नाटक राज्यातील आहेत. त्या मनमानी पध्दतीने वसुली करत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या त्रासाला अनेक कुंटूंबे अक्षरशः कंटाळली आहेत.असे निवेदनात म्हटले आहे.
मार्च पासून कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्य रोजीरोटीसाठी काम करणाऱ्या माणसाची कामेच बंद झाली. सरकार तांदूळ ,गहू ,डाळ देते पण जगण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते. त्यामुळे सामान्य कुंटूंबातील पुंजी संपली आहे.त्यातच कामधंदा नाही आणि कर्जाची वसुलीचा तगादा सुरु आहे. त्यामुळे सामान्य माणूस खचून गेला आहे. तरी शासनाने शेतकरी व उद्योजकाप्रमाणे सामान्य कुंटूंबीयांनी काढलेले फायनान्स ,बचत गट यांचे कर्ज माफ करावीत अशी मागणी केली आहे.आंदोलनात कोमल कांबळे, वैशाली पाटील, नर्मदा कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.