पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करून कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता जनतेला विश्वासात घेऊन लोकाभिमुख कामकाज करण्याला प्राधान्य असेल असे प्रतिपादन कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. बलकवडे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आठ दिवसांपूर्वी झाले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण बदली झाली नुकताच त्यांनी तेथील पदभार स्वीकारला आहे त्यांच्या जागी कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. शैलेश बलकवडे यांनी आज कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी बलकवडे यांचे स्वागत केले.
मावळते पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ज्याप्रकारे गुन्हेगारीवर अंकुश ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती त्याच पद्धतीने येथून पुढेही कामकाज सुरू ठेवणार याबरोबरच संघटित गुन्हेगारी मोडीत काढून गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा कायमस्वरूपी सुरूच ठेवणार असल्याचे बलकवडे सांगितले.
उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार्या उपक्रमांना पाठबळ देण्यात येईल असं आश्वासन बलकवडे यांनी यावेळी दिले.
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सत्यराज घुले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.