हे प्रभू, कोरोना महामारीचे हे संकट दूर कर – ख्रिस्ती बांधवांची नाताळ दिनी प्रार्थना
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आता नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे प्रभू, कोरोना महामारीचे हे संकट दूर कर. अशी प्रार्थना ख्रिस्ती बांधवांनी आजच्या नाताळ दिवशी केली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन करत नाताळ सण साजरा करण्यात आला. एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी तीन ते चार सत्रामध्ये नाताळ ची भक्ती घेण्यात आली.
कोल्हापूर शहरात वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट ,
चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, होली क्रॉस येथील सेंट झेवियर्स चर्च, सेवेन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च, विक्रम नगर येथील नोर्मा डनिंग चर्च यासह शहरातील सर्व चर्चमधून प्रार्थना करण्यात आल्या. कोरोना महामारीचे सावट गतवर्षीप्रमाणे यंदाही नाताळ सणावर होते. फटाके, आतषबाजी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे कार्यक्रम यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आले. चर्चमधून आयोजित केलेल्या प्रार्थना सभा ही मर्यादित स्वरूपाच्या होत्या. परंतु नाताळ सणाचा उत्साह मात्र कायम होता.शिक्षकांच्या बरोबरच ख्रिस्ती वसाहतीत घरांमधून केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, घरोघरी जाऊन नाताळची गाणी गाणारे गाण्याचे समूह, सांताक्लॉजचे आकर्षण या गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या लगबगीमुळे नाताळचे वातावरण तयार झाले होते. नाताळचा केक, नाताळचे डोनट हे खास आकर्षण होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे नाताळ सणानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. सरकारी रुग्णालय तसेच सेवा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. गोरगरिबांच्या साठी विविध भेटवस्तूही देण्यात आल्या. आणखीन आठवडाभर नाताळचे कार्यक्रम सर्वत्र होणार आहेत. कोल्हापूर शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च येथे सकाळी आठ वाजल्यापासून नाताळची विशेष भक्ती आयोजित करण्यात आली होती. येथे रेव्हरंट जे.ए. हिरवे, रेव्हरंट डी.बी. समुद्रे,सिनाय काळे, अशोक गायकवाड यांनी प्रार्थना सभेमधून विशेष संदेश दिला. यावेळी विश्वस्त आनंद महाळुंगेकर, उदय विजापूरकर, संदीप थोरात, संजय थोरात, विनय चोपडे सर्व कार्यकारणी व सभासद यांनी संयोजन केले. गीत गाणाऱ्या समूहानी नाताळची विशेष गाणी गायली. ख्राईस्ट चर्च येथे रेव्हरंट बी.जी मोरे यानीतर विक्रम नगर चर्च येथे रेव्हरंट संजय धनवडे यानी संदेश दिला. कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर डायसेस कौन्सिल सह सर्व चर्चमधून प्रार्थना झाल्या.