वेदगंगा नदीवर बांधलेल्या बस्तवडे -आनुर पुलाचा लोकार्पण सोहळा दिमाखात
ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाला सोहळा
आनुर येथील श्री. दत्तात्रय आरडे, सौ सुमन आरडे व बस्तवडे येथील श्री. शरद भोसले, सौ. सुलोचना भोसले यांच्या हस्ते पुलावर विधिवत गंगापूजन करण्यात आले
हलगी- कैताळाच्या निनादात बस्तवडे आणि आनुर येथील माता-भगिनीनी आणला आंबील -घुगऱ्या, लाडू व केळांचा गारवा
बस्तवडे/प्रतिनिधी : आनुरसह हमिदवाडा, कौलगे, नानीबाई चिखली, सोनगे, कुरुकली, सुरुपली, बानगे, म्हाकवे व गोरंबेच्या ग्रामस्थांची उपस्थिती अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पुलाच्या बांधकामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर
प्रत्येकी २५ मीटर लांबीच्या चार बाळ्यांचा म्हणजेच १०० मीटर लांबीचा व ०७.७५ मीटर रुंदीचा सुसज्ज पूल उभारला.
जिल्हा परिषद सदस्य अमरीषसिंह घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अथक पाठपुराव्यातून हा सुंदर पूल साकारला आहे. हा पूल जिल्हांतर्गत वाहतूकीसह सीमाभागासह कर्नाटक व पुढे गोव्याच्या वाहतुकीसाठीसुद्धा अत्यंत उपयुक्त आहे.
खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब नेहमी सांगत असत, कार्यकर्त्यांनी आकाशातला चांदसुद्धा मागावा एवढी धमक इथल्या नेत्यांमध्ये आहे. वेदगंगा नदीवर बांधलेल्या बस्तवडे आनुर पुलाच्या कामामुळे त्याची प्रचिती जनतेला आली आहे.
ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, बस्तवडे आणि आनूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याच्या असीम त्यागातूनच हा पूल साकारला आहे. या पुलाच्या बांधकामाच्या पूर्ततेचे आत्मिक समाधान फार मोठी आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब कोल्हापूर जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना जिल्ह्यातील रस्ते, पूल, आरोग्य केंद्रे, शाळा व विद्युतीकरण या मूलभूत सुविधांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी दिलेल्या मूलभूत विकासाच्या शिकवणीच्या वाटेवरूनच आम्ही हा प्रवास करीत आहोत.
व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता डी. व्ही. शिंदे, सदा साखरचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब भोसले- पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आर. डी. पाटील -कुरूकलीकर, पंचायत समितीचे सभापती जयदीप पोवार, उपसभापती सौ. मनीषा सावंत, बस्तवडेच्या सरपंच श्रीमती सोनाबाई वांगळे, उपसरपंच जयवंत पाटील, आनुर मच्या सरपंच सौ. रेखा तोडकर, उपसरपंच उमेश पाटील, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, दिग्विजयसिंह उर्फ भैय्या पाटील, दत्ता पाटील, पैलवान रविंद्र पाटील -बानगेकर, सदासाखरच्या संचालिका सौ. राजश्री चौगले, बाजार समितीच्या संचालिका सौ. सुजाता सावडकर आदी प्रमुख उपस्थित होते.