सर्व गोष्टींची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला हे दुर्दैवी- पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर /प्रतिमिधी : सर्व गोष्टींची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला हे दुर्दैवी असून त्यांना अपेक्षित असलेले उद्योग केंद्र उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. कमी कालावधीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास असणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे, त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दीवरून त्यांचे मोठेपण आणि त्यांचे आणि कामगारांचे जवळचे संबंध दिसून येतात. आमदार जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करूया, अशी भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते.कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे कर्तृत्ववान दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील पुढे म्हणाले कि, आठ दिवसापूर्वी भेटलेले आण्णा, आठ दिवसानंतर भेटणार नाहीत असं कोणालाही वाटलं नव्हतं, एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणून आण्णाची ओळख सर्वांनी पाहिलेली आहे, अंत्ययात्रेवेळी कामगारांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कामगार आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्यात किती जवळचा संबंध होता हे लक्षात आले. आमदार जाधव यांचे व्हिजन मोठ होत. प्रत्येक गोष्टीत बरकावा होता. जिल्ह्याचा आणि शहराचा विकास करण्याची तळमळ होती. ते प्रत्येक क्षेत्रात पोहचले होते, मितभाषी होते. अशाप्रकारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अण्णांच्या आठवणी जागवल्या.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आयसीयु मध्ये असतानाही त्यांनी समजकारणासाठी आणि लोकांसाठी काम थांबवले नाही, लोकांची वीज कनेक्शन तोडली जातात हे समजताच अण्णांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत याना आयसीयु मधुनच फोन केला. लोकांसाठी तळमळ ,जिद्द आणि लढाऊ माणूस आपल्यातून गेल्याच्या भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.